Now, the only result | Maharashtra Election 2019: आता धाकधूक केवळ निकालाची; चार मतदारसंघांत चुरस
Maharashtra Election 2019: आता धाकधूक केवळ निकालाची; चार मतदारसंघांत चुरस

- अजित मांडके 

ठाणे : विधानसभेसाठी मतदान पार पडले असून शहरातील चार मतदारसंघांतील निकालाकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. या चारपैकी तीन मतदारसंघांत मतांची टक्केवारी घटली आहे. तर, केवळ मुंब्रा-कळवा मतदारसंघात ती टक्केवारी काहीशी वाढली आहे. परंतु, आता या चार मतदारसंघांतील ४१ उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात निकालाची धाकधूक सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, मतदान कमी झालेल्या मतदारसंघांत कोणत्या भागात मतदान कमी झाले, याचीही चर्चा होऊ लागली असून त्याचा फटका कोणाला बसणार, यावरही ऊहापोह सुरू आहे. तर, कुठे यावेळेस चमत्कार घडणार, उद्याच्या वृत्तपत्रांची हेडलाइन काय असेल, पुन्हा प्रस्थापितच बाजी मारणार की, त्यांना धक्के बसणार आदींवर दिवसभर खलबते सुरू होती.

ठाण्यातील चारही मतदारसंघांत निवडणूक शांततेत पार पडली आहे. परंतु, कमी झालेल्या टक्केवारीची चर्चा मात्र सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात यंदा ५२.४७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मागील वेळेस ५६.५६ टक्के मतदानाची नोंद येथे झाली होती. त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार, यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेना यावेळेस संपूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरली होती का? त्यांनी भाजपला १०० टक्के मदत केली होती का? यावरच निकाल लागणार आहे, की त्यांनीही आतून मनसेसाठी काम केले, राष्टÑवादी आणि काँग्रेसच्या मतांचा मनसेला फायदा होणार का? केळकर पुन्हा कित्ता गिरवणार की, मनसेचे जाधव या मतदारसंघात केळकरांना धक्का देणार, यावरही राष्टÑवादीचे कार्यालय, मनसेच्या कार्यालयात चर्चा सुरूहोत्या.

दुसरीकडे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वाची ही लढाई मानली जात आहे. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रथमच या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सभा घेतल्याने त्यावरूनही आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांची ताकद कमी झाल्यानेच ठाकरेंवर मतदारसंघात सभा घेण्याची वेळ आल्याची चर्चा येथे चांगलीच रंगत आहे.

तिकडे ओवळा-माजिवडा मतदारसंघातही शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि मनसेतील लढाईत सरनाईक हॅट्ट्रिक मारणार का, अशी चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातही आठ टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. त्यामुळे घटलेल्या या मतदानाचा फटका कोणाला बसणार, अशी चर्चा सलग दुसºया दिवशीही या मतदारसंघात सुरू होती. अपूर्ण असलेल्या प्रकल्पांचा मुद्दा विरोधकांकडून निवडणुकीत भांडवल करण्यात आला होता. त्याचा फटका सरनाईकांना बसेल, अशी चर्चासुद्धा आहे. मात्र, विरोधी बाकावरीलही उमेदवार सक्षम नसल्याने सरनाईक हॅट्ट्रिक साधतील, अशीही चर्चा सुरू होती.

तर, मुंब्रा-कळवा मतदारसंघात एक राजकीय बाकावरील कलाकार विरुद्ध स्टेजवरील कलाकार अशी लढत रंगतदार स्थितीत झाली आहे. शिवसेनेने दीपाली सय्यद यांना उमेदवारी देऊन एक चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मागील १० वर्षांतील विकासकामांवर जितेंद्र आव्हाडांच्या बाजूने कौल जाईल, अशी चर्चा कळवा-मुंब्य्रात रंगली होती. परंतु, कलाकाराला मानणारादेखील वर्ग येथे असल्याने चेहºयाकडे बघून मतदान झाल्यास त्याचा फटका आव्हाडांना बसेल. मात्र, कामाकडे बघून मतदान झाले असल्यास त्याचा फटका शिवसेनेला बसेल, अशीही चर्चा या भागात रंगत आहे. याच मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्कयांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ती विकासकामांसाठी झाली की, सिनेअभिनेत्री निवडणुकीत उतरल्याने झाली, हे आता स्पष्ट होणार आहे.

ठाण्यातील चारही मतदारसंघांत विद्यमान चारही आमदारांचे अस्तित्व पणाला लागले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. तर, ठाणे शहरमध्ये भाजपचे संजय केळकर यांच्यासाठी ही लढत अतिशय निर्णायक ठरली आहे. सुरुवातीपासूनच त्यांच्या नावाला विरोध होता. त्यांच्याच पक्षातील अनेकांनी त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला होता. तर, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी हा मतदारसंघ हवा म्हणून हट्ट करीत होते. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेने १०० टक्के मदत केली असेल, तरच केळकरांचे चांगभलं होणार आहे. अन्यथा, या ठिकाणचा निकाल बदलण्यास शिवसेना कारणीभूत ठरणार, हेदेखील तितकेच सत्य मानले जात आहे.

क्लस्टरच्या परिणामाची उत्सुकता

क्लस्टरच्या मुद्यावरून कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात चांगलेच रान पेटले होते. १५ वर्षे या मतदारसंघात कोणतीही प्रकारची कामे झाली नाहीत. परंतु, दुसरा सक्षम पर्यायही नसल्याची चर्चाही ऐकायला मिळाली. त्यातही, या मतदारसंघातही मागील वेळेपेक्षा कमी मतदान झाले. यंदा येथे ४९.०९ टक्के मतदान झाले. जे मागील निवडणुकीपेक्षा चार टक्क्यांनी कमी आहे. काँग्रेस, मनसे आणि वंचितच्या क्लस्टरविरोधाच्या लढाईत शिंदेंचे क्लस्टरचे स्वप्न साकार होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Web Title: Now, the only result
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.