मीरा भाईंदरला स्वप्नातील शहर बनवल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द; शिंदेसेनेचा वचननामा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 20:33 IST2026-01-05T20:32:17+5:302026-01-05T20:33:15+5:30
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या वाचनाम्यात केलेल्या कामांवर भर

मीरा भाईंदरला स्वप्नातील शहर बनवल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द; शिंदेसेनेचा वचननामा जाहीर
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेसेनेने पक्षाचा वचननामा नागरिकांसाठी जाहीर केला आहे. शिवसेनेच्या ह्या जाहीरनाम्यात आम्ही केवळ आश्वासने दिलेली नसून पूर्तता केलेल्या कामांची माहिती देखील दिली असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
शिंदेसेनेचे मीरा भाईंदर संपर्क प्रमुख आणि मंत्री प्रताप सरनाईक सह दोन्ही विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सचिन मांजरेकर आणि विक्रम प्रताप सिंह यांनी मीरारोड येथील मंत्री सरनाईक यांच्या कार्यालयात वचननामा जाहीर केला. इतर पक्षाच्या नेत्यांप्रमाणे काय काम करणार? असा जाहीरनामा न देता आपल्या वाचनाम्यात ९०% झालेल्या कामांची आणि काही पूर्णत्वास असलेल्या विकासकामांची माहिती दिलेली आहे असे मंत्री सरनाईक म्हणाले.
मीरा भाईंदरच्या नागरिकांचे स्वप्न असलेला मेट्रो प्रकल्पचा काशिगाव पर्यंतचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला असून निवडणुकीच्या आचार संहिते मुळे मेट्रो सुरु होऊ शकली नाही. आचार संहिता संपताच मेट्रो सुरु होईल. भाईंदर पर्यंतची मेट्रो ह्याच वर्षी सुरु होईल. मेट्रोच्या खाली ३ उड्डाणपूल करून घेतल्याने वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. शहरात पॉड टॅक्सी सुरु करण्यास मंजुरी झाली असून त्याची कार्यवाही सुरु आहे. दहिसर-भाईंदर लिंक रोड हा मंजूर करून घेऊन निविदा पूर्ण होऊन आता कामास सुरवात होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि टोलनाका येथील कोंडी संपुष्टात येणार आहे. लोकांना मुंबईला जायला पर्यायी मार्ग मिळणार आहे. महापालिकेची डबघाईला आलेली परिवहन सेवा सुधारणार व अद्यावत करणार आहोत.
मीरा भाईंदरकरांची तहान कायमची भागवणारा सूर्या पाणी प्रकल्प अंतिम टप्यात असून २१८ एमएलडी पाणी मे - जून पासून मिळणार आहे. जुन्या व धोकायदाक इमारतीच्या पुनर्विकासाचा सर्व अडसर दूर केला असून मिनि क्लस्टर डेव्हलपमेंट मंजूर केल्याने नागरिकांची हक्काची घरे त्यांना मिळती. शहराचा नियोजित विकास होईल. झोपडपट्टी पुनर्वसन योजना अमलात आणली जाऊन तेथील लोकांचे जीवनमान उंचावणार आहोत. स्व. इंदिराबाई सरनाईक कॅशलेस रुग्णालय नागरिकांसाठी सुरु झाले असून मीरारोड येथे नवीन ४०० खाटांचे स्व. गिल्बर्ट मेंडोन्सा रुग्णालयाचे बांधकाम सुरु आहे.
भाईंदर पूर्वेला महापालिकेची पहिली सीबीएससी शाळा बांधून पूर्ण असून येत्या शैक्षणिक वर्षात सुर करण्याचा प्रयत्न आहे. मीरा भाईंदर वायफाय सिटी होणार असून त्याचे काम सुरु आहे. शहरातील पहिले नाट्यगृह लता मंगेशकर नाट्यगृह हे कलाप्रेमी साठी बांधून सुरु झाले आहे. सर्वाना आकर्षण ठरलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन नागरिकांसाठी खुले झाले आहे. ट्राफिक गार्डन सुरु केले आहे. मंगेशकर संगीत गुरुकुल चे काम पूर्णत्वास आले आहे. ऑलम्पिक धर्तीवर तरण तलाव आणि जिमची कामे अंतिम टप्प्यात आहेत. स्मशानभूमी अद्यावत केल्या असून आणखी काही बाकी आहेत. राज्यातील प्राण्यांसाठीची पहिली स्मशानभूमी सुरु केली आहे.
५१ फूट उंच विठ्ठल मूर्ती आणि तलावांचे सुशोभीकरण, घोडबंदर किल्ला व शिवसृष्टीची उभारणी, वारकरी भवन, मराठा भवन सह अनेक सामाजिक भवन बांधून झाली आहेत. अनेक भवन बांधकामे सुरु आहेत. नवीन महापालिका मुख्यालय आणि कांदळवन उद्यान, घोडबंदर किनारा सुशोभीकरण आदी अनेक प्रकल्प पूर्णत्वास आणणार आहे. महिलांसाठी 'उमेद मॉल' संकल्पना साकारणार आहे. बचत गट व महिलांनाच ह्या मॉल मध्ये दुकाने सुरु करून दिली जातील व त्यांना उद्योजिका - स्वावलंबी बनवणार आहोत. गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही, पोलीस बळ वाढवणे यासाठी प्रयत्न करणार. अमली पदार्थ विरोधी मोहीम पोलिसांना राबवायला लावली आहे असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
गेल्या साडेतीन वर्षांत महापालिकेत सत्ता नसतानाही शासना कडून शहरासाठी आणलेल्या प्रकल्पांची माहिती दिली आहे. वचननाम्यात ९०% पूर्ण झालेली विकासकामे आणि उर्वरित प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला आहे. केलेल्या विकासकार्यांवर विश्वास ठेवून जनता महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची संधी देईल अशी खात्री आहे. मिरा-भाईंदर शहर हे येत्या काळात अधिक विकसित, सुंदर आणि स्वप्नातील शहर बनल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे असे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.