ठाण्यात संध्याकाळपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान होईल, प्रताप सरनाईक यांचा दावा
By अजित मांडके | Updated: January 15, 2026 16:11 IST2026-01-15T16:03:59+5:302026-01-15T16:11:48+5:30
Thane Municipal Corporation Election ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत ठाणेकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ठाण्यातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वतःला झोकून दिले असून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

ठाण्यात संध्याकाळपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान होईल, प्रताप सरनाईक यांचा दावा
- अजित मांडके
ठाणे - ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत ठाणेकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ठाण्यातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वतःला झोकून दिले असून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
सरनाईक म्हणाले, “ठाणेकरांचा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासाठी केलेल्या विकासकामांचा विचार करून नागरिक मतदान करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे त्यांनी सांगितले. मतदानादरम्यान काही ठिकाणी शाई पुसली जात असल्याचे आरोप होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना सरनाईक म्हणाले की, याबाबत निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली आहे. “बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे,” अशी मागणी त्यांनी केली.
ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारींबाबत बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, सुरुवातीला काही ठिकाणी अडचणी होत्या. मात्र आता सर्व यंत्रणा सुरळीत झाली असून याप्रकरणी आयुक्तांना आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले की, “विरोधकांना पराभव स्पष्टपणे दिसू लागला आहे, त्यामुळेच असे आरोप केले जात आहेत. उद्या निकालानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर निवडून येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार संजय राऊत यांच्या सोशल मीडिया वक्तव्यांवर टीका करताना सरनाईक म्हणाले, “संजय राऊत कधी काय ट्वीट करतील याचा नेम नसतो. प्रसिद्धीत राहण्यासाठी ते भोंग्यासारखे बोलत असतात,” अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, युवासेना नेते पुर्वेश सरनाईक यांच्याबाबत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, “मी त्याचं कौतुक केवळ वडील म्हणून करत नाही. तो युवासेनेत सक्रियपणे काम करत असून महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेत आहे. याचा मला अभिमान आहे,” असे त्यांनी सांगितले.