आमदार रईस शेख यांच्याच हाती दालनाची चावी! भिवंडी महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी
By नितीन पंडित | Updated: January 23, 2026 11:22 IST2026-01-23T11:19:16+5:302026-01-23T11:22:06+5:30
काँग्रेसच्या ३० जागा निवडून आल्याने त्यांच्याच महापौर होईल, हे जवळपास निश्चित आहे

आमदार रईस शेख यांच्याच हाती दालनाची चावी! भिवंडी महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने दिग्गजांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काँग्रेसच्या ३० जागा निवडून आल्याने त्यांच्याच महापौर होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेससोबत राष्ट्रवादी (शरद पवार) व समाजवादी पक्ष येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे २४ नगरसेवक हे समाजवादी पक्षाचे आ. रईस शेख यांचे समर्थक आहेत. त्यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आ. शेख हेच महापौर ठरवतील, अशी स्थिती आहे.
राष्ट्रवादीचे (शरद पवार) १२, समाजवादीचे ६ नगरसेवक आहेत. ९० नगरसेवक असलेल्या सभागृहात बहुमतासाठी ४६ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. तिन्ही मिळून ४८ नगरसेवक होतात. काँग्रेसचे ३० सदस्य असून त्यापैकी २४ नगरसेवक हे सपा आ. रईस शेख यांचे समर्थक आहेत. निवडणुकीत कोणताही दगाफटका नको यासाठी खबरदारी म्हणून या २४ नगरसेवकांना आ. शेख यांनी दोन दिवसांपूर्वीच अज्ञात स्थळी नेले.
तारिक मोमीन : काँग्रेसकडून प्रभाग ९ अ मधून पहिल्यांदा निवडून आले आहेत. बांधकाम व्यावसायिक आहेत. काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी समाजवादी पक्षाचे आ. रईस शेख यांच्या नगरसेवकांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. मोमीन हे आ. शेख यांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांच्या नावाला समाजवादी पक्षाचाही पाठिंबा असेल.
समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी व आ. शेख यांच्यात निवडणुकीदरम्यान वाद झाला होता. त्यामुळे शेख यांच्या समर्थकांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविली. त्यातील २४ जण विजयी झाले आहेत.