"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
By धीरज परब | Updated: December 24, 2025 19:19 IST2025-12-24T19:05:26+5:302025-12-24T19:19:48+5:30
विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची निवडणूक प्रचारसभा

"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या उत्तन प्रचार सभेत शासनाचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना व्यासपीठावर मंत्री नितेश राणे यांनी बसवले. यावेळी बोलताना, "तुम्ही जर आम्हाला मतदान केले, तर तुमचे प्रश्न सोडवू हा शब्द. पण मतदान जर दुसरीकडे केले, तर माझा स्वभाव दुसऱ्यांसारखा नाही," असा इशारा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिला.

भाईंदरच्या उत्तन येथे मंगळवारी रात्री राणे यांची सभा झाली. मी मंत्री असून प्रश्न सोडवण्याचे मला अधिकार दिले आहेत. जेट्टी, मच्छी मार्केट बनवण्याचे अधिकार माझ्या कडे आहेत. एलईडी आदींवर कारवाई होते तशी पारंपरिक मच्छीमारांवर कारवाई व्हायची नसेल तर ते अधिकार पण माझ्या कडे आहेत. बंधारा कुठे हवा सांगा. कुठे नको सांगा तो तुमच्या समोर डिसरणार नाही. मी बनवू शकतो तर बंद करण्याचे अधिकार पण माझ्या कडेच आहेत. म्हणून मत्स्य खात्याचे सहायक आयुक्त पाटलांना पण येथे स्टेजवर बसवलेले आहे. मंत्री काय बोलतात आणि उद्या पासून कसे वागायचे हे कळले पाहिजे म्हणून स्टेज वर बसवले आह असे मंत्री राणे म्हणाले.
येणाऱ्या वर्षात २६ नवीन योजना मच्छीमारांसाठी आणतोय. मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही. कोळीवाड्यांचा प्रश्न सोडवू. आमच्या कडेच प्रश्न सोडवायचे वॅक्सीन आहे. बाकी सर्व फुसफुस करत बसतील. आचार संहिता संपताच ठरवा मासळी मार्केटचे भूमिपूजन करू असे मंत्री राणे म्हणाले. यावेळी आमदार नरेंद्र मेहता, हेरल बोर्जिस, विद्याधर रेवणकर, संदीप बुर्केन आदी उपस्थित होते.
आचार संहिता लागू असताना उत्तन येथील मच्छीमारांना बोलावण्यात आलेल्या निवडणुकीच्या पक्ष प्रचार सभेत व्यासपीठावर पालघर - ठाणे मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांना बसवण्यात आले होते. आचार संहिता काळात शासनाच्या सहायक आयुक्ताला बसवून मच्छीमारांवर प्रभाव आणि दबाव टाकण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि आचार संहिता भंग केल्याचा आरोप या भागातील विविध पक्षाच्या मच्छीमार प्रमुखांनी केला आहे. कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे आमिष दाखवत दुसरीकडे मत दिले नाही तर प्रश्न सोडवणार नाही, योजना व सुविधा देणार नाही अश्या प्रकारची धमकीच मंत्री यांनी मच्छीमारांना दिली. पण मच्छीमार असल्या धमक्यांना भीक घालत नाही असे स्पष्ट करत अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे.