भाजप म्हणते राष्ट्रवादीला ८ जागा देऊन युती झाली तर राष्ट्रवादी सांगते की, कुठल्या ८ जागा? युती अजून झालेली नाही
By धीरज परब | Updated: December 26, 2025 19:56 IST2025-12-26T19:56:42+5:302025-12-26T19:56:45+5:30
Mira Bhayander Municipal Corporation Election: मुंबई, पुणे, ठाण्या सह अनेक महापालिका निवडणूक ठिकाणी भाजपाने महायुती मधील राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाला लांब ठेवले असतानाच मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत मात्र भाजपाने राष्ट्रवादी सोबत युती करून त्यांना ८ जागा सोडल्या आणि आमचे २ नगरसेवक दिले असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

भाजप म्हणते राष्ट्रवादीला ८ जागा देऊन युती झाली तर राष्ट्रवादी सांगते की, कुठल्या ८ जागा? युती अजून झालेली नाही
मीरारोड - मुंबई, पुणे, ठाण्या सह अनेक महापालिका निवडणूक ठिकाणी भाजपाने महायुती मधील राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाला लांब ठेवले असतानाच मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत मात्र भाजपाने राष्ट्रवादी सोबत युती करून त्यांना ८ जागा सोडल्या आणि आमचे २ नगरसेवक दिले असे माध्यमांशी बोलताना सांगितले. परंतु राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी मात्र, कुठल्या ८ जागा सोडल्या? असा प्रश्न करत युती झाली नसून आम्ही १८ जागा मागितल्या असल्याचे स्पष्ट केले.
शुक्रवारी मीरारोडच्या भाजपा कार्यालयात आ. मेहतांनी पत्रकार परिषद दरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले कि, भाजपाच्या ६६ जागा आणि ८ जागा राष्ट्रवादीला युती मध्ये सोडल्या असल्याने शिवसेनेशी उरलेल्या २१ जागांवर युती बाबत चर्चा केली जाईल. इतकेच नव्हे तर भाजपा सोबत असलेले २ नगरसेवक राष्ट्रवादीला दिल्याचे देखील आ. मेहता म्हणाले.
आ. मेहतांच्या वक्तव्या बाबत राष्ट्रवादी ( अजित पवार) चे मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी सांगितले कि, आ. मेहतांनी कोणत्या ८ जागा सोडल्या आहेत हे आम्हालाच माहिती नाही. आमची युती भाजपा व शिवसेनेशी अजून झालेली नाही. युतीसाठी १८ जागांची मागणी केली आहे. प्रभाग ३, ९, १०, ११, १४, १५, २२, २४ आदी मधील जागा राष्ट्रवादीसाठी मागिलत्या आहेत. त्या दिल्या तर युती करू अन्यथा वेगळा पर्याय ठरवू.
प्रभाग ९ आणि २२ मध्ये भाजपा लढू शकत नाही कारण त्यांना तिकडे मतदान होणार नाही. प्रभाग ९ चे पूर्ण पॅनल लढवण्याची आमची तयारी होती. येथील माजी नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख हे भाजपात गेले होते. मात्र भाजपच्या चिन्हावर त्यांना निवडून यायची खात्री नव्हती. पाटील हे गेले काही महिने आपल्या संपर्कात होते व त्यांच्यासह शेख हे भाजपातून राष्ट्रवादी मध्ये आले आहेत असे कांबळे यांनी स्पष्ट केले. कांबळे यांच्या स्पष्टीकरण मुळे आ. मेहता खरे कि खोटे बोलले ? अशी चर्चा रंगली आहे.