"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
By प्रविण मरगळे | Updated: January 5, 2026 16:40 IST2026-01-05T16:34:27+5:302026-01-05T16:40:57+5:30
धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागाही आम्ही भाजपासाठी सोडल्या. अशा परिस्थितीत महायुती व्हावी आणि ती टिकावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो असं सरनाईक यांनी म्हटलं.

"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
ठाणे - राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकेत भाजपाने शिंदेसेनेसोबत युती केली आहे. परंतु मीरा भाईंदरमध्ये भाजपा आणि शिंदेसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. याठिकाणी महायुती झाली नाही. त्यानंतर आता शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यात शाब्दिक चकमक उडताना दिसत आहेत. त्यात भाजपासोबत युतीसाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु ही युती होऊ शकली नाही असं सांगत सरनाईक यांनी मेहता यांना जबाबदार धरले आहे.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, भाजपासोबत युती व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा होती. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि वसई विरारमध्ये ज्यारितीने युतीचा पॅटर्न ठरला तसं मीरा भाईंदरमध्ये व्हावे असं आम्हाला वाटत होते. मात्र भाजपाचे इथले नेते आहेत त्यांनी पक्षाला खासगी मालमत्ता बनवले आहे. भाजपाला त्यांना वेठीस धरले असेल तर ते चुकीचे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मी मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही कल्पना दिली होती. ज्यापद्धतीने ठाण्याला युती झाली तसेच मीरा भाईंदरमध्ये युती होण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केला होता असं त्यांनी सांगितले.
तसेच रवींद्र चव्हाण यांनी युतीबाबत एक पत्र काढले. त्यानंतर मी भाजपाच्या कार्यालयात गेलो मात्र तिकडे त्यांनी मला ५० मिनिटे बसवून ठेवले. त्यानंतर नरेंद्र मेहता आले. त्यांनी युतीची काहीच बोलणी केली नाही आणि २ दिवसांनी युती तुटली असं त्यांनी जाहीर केले. आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो. ओवळा माजिवडा मतदारसंघातील २ वार्ड आम्ही त्यांना दिले. धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागाही आम्ही भाजपासाठी सोडल्या. अशा परिस्थितीत महायुती व्हावी आणि ती टिकावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. महायुतीत चांगले वातावरण असताना तेच वातावरण मीरा भाईंदरमध्ये होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, मात्र त्याला नरेंद्र मेहतांकडून प्रतिसाद मिळत नसेल तर निश्चितपणे हे महायुतीसाठी घातक आहे अशी खंत प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नरेंद्र मेहता यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती पण ती झाली नाही. मात्र १५ तारखेला मीरा भाईंदरमधील जनता त्यांना धडा शिकवेल आणि महायुतीऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या महापालिकेवर फडकेल. आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. त्यामुळे हिंदुत्वाचा भगवा महापालिकेवर फडकेल आणि बाळासाहेबांनी जी युती वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्यासोबत केली होती ती आम्ही कायम ठेवू असंही प्रताप सरनाईकांनी म्हटलं.