मिरा-भाईंदर महापालिकेने झाकले ११०० नामफलक
By धीरज परब | Updated: January 5, 2026 13:17 IST2026-01-05T13:17:05+5:302026-01-05T13:17:05+5:30
शहरातील बॅनरसह झेंड्यांवरही केली कारवाई

मिरा-भाईंदर महापालिकेने झाकले ११०० नामफलक
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोडमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेनुसार सार्वजनिक ठिकाणी असलेले एक हजार १३४ महापालिकेचे व राजकीय नामफलक कागद वा प्लास्टिक तसेच चिकटपट्टीने झाकण्यात आले आहेत. या नामफलकांचा मतदारांवर कोणताही प्रभाव पडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून ही खबरदारी घेतली जाते.
महापालिकेच्या वतीने रस्ते, पदपथ, समाज भवन, उद्याने, नाले, शौचालये, सेल्फी पॉइंट, रस्ते आदी विविध बांधकामे, विकासकामे केली जातात. त्यासाठी लागणारा पैसा जनतेच्या करातून महापालिका वा शासन करत असते. शहरात इतक्या मोठ्या संख्येने हे सार्वजनिक ठिकाणी नामफलक लागले असले तरी त्यात महापालिकेचे नाव वापरून लावलेले अनधिकृत नामफलक किती? याची देखील चौकशी होणे आवश्यक आहे. परंतु महापालिका प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आली आहे.
६ प्रभाग समिती हद्दीत कार्यवाही
या विकासकामांची मागणी, पाठपुरावा, तसेच उद्घाटन किंवा भूमिपूजन केल्याबद्दल नामफलक लावले जातात. त्यावर पालिकेतील तत्कालीन पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आदींची नावे असतात.
या शिवाय शासकीय कामे, राजकारणी व लोकसेवक यांचे फलक, पक्षाची चिन्ह असलेले नामफलक लावलेले असतात. नामफलकांमुळे मतदारांवर प्रभाव पडू नये म्हणून आचारसंहिता लागताच या नामफलकांवर चिकटपट्टी, प्लास्टिक आदी लावण्याचे काम महापालिका करत असते.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर महापालिकेने शहरातील बॅनर, झेंडे काढण्याची कारवाई सुरू करतानाच नामफलक झाकण्याचे सुरू केले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागांतर्गत ६ प्रभाग समिती कार्यालयातील पथकांनी आतापर्यंत १ हजार १३४ इतके नामफलक झाकलेले आहेत.