Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंच्या भावाला तिकीट नाही; शिवसेनेनं दिला कल्याण पश्चिमेत 'हा' उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 20:18 IST2019-10-02T20:18:04+5:302019-10-02T20:18:46+5:30
कल्याण पश्चिम विधानसभा 2019 - कल्याण पश्चिम जागेसाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Maharashtra Election 2019: आदित्य ठाकरेंच्या भावाला तिकीट नाही; शिवसेनेनं दिला कल्याण पश्चिमेत 'हा' उमेदवार
कल्याण - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येत आहे. शिवसेनेने उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरु केलं आहे. शिवसेना-भाजपा युतीत कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेनं भाजपाकडून काढून घेतली आहे. कल्याण पश्चिम शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ही जागा शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती.
कल्याण पश्चिम जागेसाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र ही चर्चा फोल ठरवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कल्याण पश्चिमेची उमेदवारी शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना दिली आहे. त्यामुळे वरुण सरदेसाई यांचा पत्ता कट झाल्याची माहिती आहे.
कल्याण पश्चिम विधानसभेवर 2009 मध्ये मनसेचे आमदार प्रकाश भोईर निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये या विधानसभेवर भाजपाचे नरेंद्र पवार आमदार झाले होते. युतीच्या जागावाटपात भाजपाकडून ही जागा शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे नाराज झालेले नरेंद्र पवार आणि भाजपा कार्यकर्ते अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. तर मनसेकडून या मतदारसंघात पुन्हा एकदा प्रकाश भोईर यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील तिरंगी लढत पाहायला मिळेल का याचं उत्तर काही दिवसात मिळेल.