ठाण्यात सर्व प्रभागांसाठी मुलाखती; लक्ष वरिष्ठांच्या निर्णयाकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 07:52 IST2025-12-24T07:52:24+5:302025-12-24T07:52:55+5:30
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना यांच्यात युती होईल असे चित्र आहे. पहिल्या दोन बैठका पार पडल्या.

ठाण्यात सर्व प्रभागांसाठी मुलाखती; लक्ष वरिष्ठांच्या निर्णयाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भाजप-शिंदेसेना यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा पुढे सरकत नसल्याने ठाण्यात शिंदेसेनेने मंगळवारपासून १३१ जागांसाठी मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला. स्थानिक पातळीवर स्वबळाची चाचपणी दोन्ही पक्षांकडून सुरू असतानाच युतीचा निर्णय वरिष्ठ नेते जाहीर करतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे केवळ कार्यकर्त्यांमधील संभाव्य बंड थोपविण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना यांच्यात युती होईल
असे चित्र आहे. पहिल्या दोन बैठका पार पडल्या.
भाजपने वरिष्ठांकडे ठाण्यातील ५२ जागांचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत भाजपकडे २४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेच्या काही जागांवर भाजपने दावा केला. मात्र, दुसऱ्या बैठकीनंतरही चर्चा पुढे सरकू शकलेली नाही.
भाजपची स्वबळ चाचपणी
शिंदेसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवारी भाजपने स्वबळाची चाचपणी सुरू केली. तसेच इच्छुकांना कामाला लागा असा सल्ला दिला. त्यामुळे युतीच्या संभाव्य शक्यतेमुळे नाराज इच्छुकांना हुरूप चढला आहे.
तर दुसरीकडे मंगळवारपासून शिंदेसेनेनी १३१ प्रभागांसाठी मुलाखती सुरू केल्या आहेत. आनंद आश्रम येथे खा. नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, रवींद्र फाटक, ए. एस. पाटील, हणमंत जगदाळे, हेमंत पवार, रमेश वैती यांनी मुलाखती घेतल्या.
मुलाखती आटोपल्या
ज्या प्रभागात अधिक इच्छुक होते, त्या ठिकाणच्या मुलाखती लांबल्या. मात्र जेथे इच्छुक कमी होते, त्या ठिकाणच्या मुलाखती दोन मिनिटांत उरकण्यात आल्या. एकीकडे मुलाखती सुरू असताना खा. म्हस्के यांनी भाजपसोबत युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असून, तो लवकरच जाहीर होईल, असा दावा केला. दोन्ही पक्षांकडून युतीच्या चर्चेचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात टोलवला. मात्र स्थानिक पातळीवरील चर्चा थांबली आहे.