वसईत क्लोरिन गॅस गळती; एकाचा मृत्यू, तर १५ जण बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 21:35 IST2025-11-25T21:35:26+5:302025-11-25T21:35:43+5:30
काही क्षणातच पसरल्याने रहिवाशांना श्वसनकष्ट, उलट्या, चक्कर येऊ लागली आणि घबराटीत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले.

वसईत क्लोरिन गॅस गळती; एकाचा मृत्यू, तर १५ जण बाधित
नालासोपारा (मंगेश कराळे) : वसईच्या दिवाणमान येथील मनपाच्या पाण्याच्या टाकीच्या खाली असलेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वीपासून ठेवलेल्या सिलेंडरमधून मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास क्लोरिन विषारी हिरवा वायू गळती झाल्याने व परिसर हिरव्या विषारी धुराने व्यापल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. हिरव्या रंगाचा विषारी क्लोरिन वायू वेगाने परिसरात काही क्षणातच पसरल्याने रहिवाशांना श्वसनकष्ट, उलट्या, चक्कर येऊ लागली आणि घबराटीत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले.
मनपाने शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. दिवाणमान येथील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी ४ ते ५ कर्मचारी आले होते. त्यावेळी पाण्याच्या टाकीच्या खाली नगरपालिकेच्या काळापासून क्लोरिन गॅस असलेली जुन्या व गंजलेल्या टाकीला धक्का लागला व ती पडली. त्याबरोबर त्या सिलेंडर टाकीतून हिरव्या रंगाचा क्लोरिन वायू वेगाने हवेत पसरला. आजूबाजूच्या सोसायटीत आरडाओरड झाल्याने सर्व रहिवाशी सोसायटीचे आवारातुन लगबगीने निघत होते. काही सोसायटीच्या गेटपासुन नागरिक खोकत खोकत बाहेर पडत होते. परिसरात असलेल्या स्मशानभुमीचे मुख्य रस्त्यावर रहिवाशी आले. त्यांनी रिक्षावाल्यांना कसला वास येत आहे याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी क्लोरिन गॅस वायुचा बाटला लिकेज झाला आहे व त्याचा उग्र वास येत असल्याचे सांगितले.
या दुर्घटनेत एका ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून १५ नागरिक बाधित झाले आहे. सहा नागरिकांना उपचारासाठी डिवाइंड हॉस्पिटलमध्ये नेले असून त्यातील तिघांना आयसीयू वार्डमध्ये भरती केले आहे. तर पाच जण डीएम पेटिट हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. कारवाई दरम्यान चार अग्निशामक दलाचे कर्मचारीही गॅसच्या संपर्कात येऊन जखमी झाले असून त्यांच्यावर बॅन्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर फायर ब्रिगेड व माणिकपूर पोलिस घटनास्थळी धावून आले. तब्बल एक तासाच्या धोकादायक ऑपरेशननंतर गळती करणारा सिलेंडर निष्क्रीय करण्यात आला. तोपर्यंत सनसिटी परिसर संपूर्णपणे धुराने वेढलेला होता. नागरिकांनी निवासी भागात धोकादायक सिलेंडर साठवण्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दुपारच्या सुमारास दिवाणमान परिसरात पाण्याच्या टाकीच्या खाली असलेल्या जुन्या सिलेंडरमधून विषारी हिरव्या रंगाचा क्लोरिन वायू लिकेज झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून १० ते १२ नागरिक बाधित झाले आहे. एकाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे बघावे लागेल. - पौर्णिमा चौगुले, पोलिस उपायुक्त