पालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांचे निघाले घामटे, प्रभाग समिती कार्यालयात उमेदवारांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:24 IST2025-12-31T15:24:04+5:302025-12-31T15:24:15+5:30
निवडणूक कर्मचारी कामाच्या बोजामुळे कावले...

पालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांचे निघाले घामटे, प्रभाग समिती कार्यालयात उमेदवारांच्या रांगा
ठाणे : बंडखोरी टाळण्याकरिता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर न करता सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत एबी फॉर्मचे वाटप सुरू ठेवल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता वेगवेगळ्या शहरांत केलेल्या यंत्रणेवर कमालीचा ताण आला. दुपारी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल करायला गेलेले उमेदवार रात्री अर्ज भरून बाहेर पडले. या काळात अनेकांना घोटभर पाणी मिळाले नाही. प्रचंड गर्दी असल्याने बसायला जागा नव्हती. रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करून घेण्याचे काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचे व मुख्यत्वे महिला कर्मचाऱ्यांचे कमालीचे हाल झाले.
एबी फॉर्म मिळण्यासाठी उमेदवार रात्रभर पक्षाच्या कार्यालयात ताटकळले. शिंदेसेनेने दुपारी दीड वाजेपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्मसाठी थांबवले होते. एबी फॉर्म हाती पडल्यानंतर पोलिसांच्या सल्ल्याने अनेकांनी शक्तिप्रदर्शनाच्या मिरवणुका काढल्या. एकाचवेळी एकाच प्रभागातील प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार नाही, याची खबरदारी पोलिसांना घ्यावी लागली. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयांच्या ठिकाणी गर्दी झाली.
उमेदवार रांगेत ताटकळले
ज्यांना रात्री अर्ज मिळाले, त्यांनी सकाळीच प्रभाग समितीचे कार्यालय गाठले. वाजत-गाजत, फटाके फोडत अर्ज भरले. परंतु एकाच दिवशी शेकडो उमेदवार अर्ज भरण्यासाठी आल्याने निवडणुकीचे कामकाज पाहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हाल झाले.
अनेकांना दुपारचे जेवण घेता आले नाही. हापालिकेच्या माध्यमातून पाणी किंवा बसण्याची व्यवस्था नसल्याने उमेदवारांना रांगेत तीन ते पाच तास ताटकळत उभे राहावे लागले.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेने वेगवेगळ्या प्रभाग कार्यालयांत अर्ज दाखल करण्याची व्यवस्था केली. महायुती आणि महाविकास आघाडीने शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्मचे वाटप करण्याचे टाळून महापालिकेची व्यवस्था कोलमडवली.
अनेक ठिकाणी वादावादी
दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार होते; पण अर्ज दाखल करणाऱ्यांची इतकी गर्दी झाली की, रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करणे सुरू होते.
वर्तकनगर भागातील जिम्नॅस्टीक सेंटरमध्ये असलेल्या निवडणूक कार्यालयात उमेदवारांचा लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. याठिकाणी पंख्याची, पाण्याची किंवा बसण्याची सुविधा नव्हती.
काही उमेदवार आपल्या लहान मुलांना घेऊन आले होते. त्यांचे याठिकाणी हाल झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या एकेका उमेदवाराला अर्ज दाखल करण्याकरिता तासन् तास लागले. काही ठिकाणी अतिशय संथपणे काम सुरू असल्याचा फटका उमेदवारांना बसला. काही ठिकाणी उमेदवारांचे समर्थक व निवडणूक कर्मचारी यांचे वाद झाले.
अर्ज दाखल करताना झाली दमछाक
पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस असतानाही निवडणूक लढवणाऱ्या एकाही राजकीय पक्षाकडून त्यांच्या अधिकृत उमेदवारांची यादी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाली नाही.
मनसेने मात्र कल्याण, डोंबिवलीतील ४९ उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी ती अपूर्ण होती. मनसेच्या यादीत भाजप आणि शिंदेसेनेकडून ज्या माजी नगरसेवक, पक्षाच्या प्रबळ दावेदारांना उमेदवारी नाकारण्यात आली.
अशा दोन्ही पक्षांतील अनेक उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारची गडबड आणि गोंधळाची राजकीय परिस्थिती यापूर्वी कधीच झाली नाही.
४९ उमेदवारांची यादी मनसेने जाहीर केली. मनसेच्या यादीत भाजप आणि शिंदेसेनेकडून ज्या माजी नगरसेवक, पक्षाच्या प्रबळ दावेदारांना उमेदवारी नाकारण्यात आली.