भिवंडी पश्चिमेत काँँग्रेससमोर उमेदवारनिवडीचा पेच; युतीचे बिनसले तर भाजपसाठी मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 12:05 AM2019-09-09T00:05:46+5:302019-09-09T00:06:42+5:30

भिवंडी पश्चिम मतदारसंघात शहरात मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत.

Candidate selection process before Congress in Bhiwandi West; | भिवंडी पश्चिमेत काँँग्रेससमोर उमेदवारनिवडीचा पेच; युतीचे बिनसले तर भाजपसाठी मोठे आव्हान

भिवंडी पश्चिमेत काँँग्रेससमोर उमेदवारनिवडीचा पेच; युतीचे बिनसले तर भाजपसाठी मोठे आव्हान

Next

नितीन पंडित

भिवंडी : भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून भाजपचे आमदार महेश चौघुले हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदीलाटेचा फायदा घेत काँग्रेस आणि समाजवादीच्या हातातून हा मतदारसंघ भाजपने खेचून घेतला. यापूर्वी या मतदारसंघावर समाजवादी आणि काँग्रेसचेच वर्चस्व राहिलेले आहे. सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत तरी सेना-भाजपची युती असली तरी युती तुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेत ऐनवेळी उमेदवाराची शोधाशोध नको म्हणून भाजपने नुकत्याच या मतदारसंघासह भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहाही जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व तसेच विद्यमान आमदार स्वत: भाजपचे असूनही या मतदारसंघासाठीही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यातच भाजपतर्फे आपण विद्यमान आमदार असूनही पश्चिम मतदारसंघासाठीही पक्षश्रेष्ठींनी मुलाखती घेतल्याने चौघुले यांना झालेला संताप व त्यांचा चढलेला पारा सर्वांनी पाहिला आहे.

विशेष म्हणजे मुलाखतीच्या ठिकाणी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढलेले भिवंडीतील साईनाथ पवार हजर झाल्याने आमदार चौघुले यांनी थेट पवार यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत त्यांच्याशी वाद घातला. त्यामुळे पवार हे चौघुले यांना उमेदवारीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मुलाखतीत चौघुले यांच्यासह नगरसेवक सुमित पाटील, श्याम अग्रवाल, निलेश चौधरी, विरोधी पक्षनेते यशवंत टावरे, हर्षल पाटील, शांताराम भोईर अशी नेतेमंडळी उपस्थित होती. यामुळे निवडणूक जिंकण्याबरोबरच आपली उमेदवारी टिकवून ठेवण्याचे दुसरे आव्हान चौघुले यांच्यासमोर निर्माण झाले आहे.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघावर यापूर्वी समाजवादीचे वर्चस्व होते. २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली, त्यावेळी भिवंडीचे विधानसभेचे पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण असे तीन भाग झाले. त्यानंतर, विभक्त झालेल्या भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये समाजवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांनी तगडे उमेदवार दिले होते. २००९ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने आपले अस्तित्व व वर्चस्व सिद्ध केले होते. २००९ च्या निवडणुकीत समाजवादीचे रशीद ताहीर मोमीन हे या मतदारसंघातून निवडून आले होते. या निवडणुकीत समाजवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांनी तगडे उमेदवार दिले असले, तरी खरी लढत दिली होती, ती अपक्ष उमेदवार साईनाथ पवार यांनीच. या निवडणुकीत मोमीन यांना ३० हजार ८२५ मते मिळाली होती, तर पवार यांना तब्ब्ल २९ हजार १३४ मते मिळाली होती. केवळ एक हजार ६९१ मतांनी मोमीन हे या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, तरीही पवार यांची या मतदारसंघावर आजही मजबूत पकड आहे. पवार हे शिवसेनेत असले तरी सध्या पक्षात तितकेसे सक्रिय नसल्याने थेट भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित झाल्याने त्यांच्याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. चौघुले, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शोएब गुड्डू, शिवसेनेतर्फे उपमहापौर मनोज काटेकर, राष्ट्रवादीतून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन तर एमआयएममधून जकी अब्दुल शेख असे उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत चौघुले विजयी झाले होते. चौघुले यांना ४२ हजार ४८३ मते, गुड्डू यांना ३९ हजार १५७ मते, शिवसेनेचे काटेकर यांना २० हजार १०६ मते, राष्ट्रवादीचे मोमीन यांना १६ हजार १३१ मते तर एमआयएमचे उमेदवार जॅकी अब्दुल शेख यांना चार हजार ६८६ अशी मते मिळाली होती. मोदीलाटेचा फायदा उचलूनही केवळ तीन हजार ३२६ मतांनी चौघुले यांचा विजय झाला होता.

आता २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातील गणिते बदलण्याची शक्यता आहे. सेना-भाजपची युती झाल्यास भाजप उमेदवाराला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. मात्र, युतीचे बिनसले तर काँग्रेस, भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकणार आहे. सध्या भिवंडी पालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने या गोष्टीचा फायदा निश्चितच काँग्रेसला होणार आहे. विशेष म्हणजे भिवंडी पश्चिम मतदारसंघ भाजपकडे व महापालिकेची सत्ता काँग्रेसकडे असूनही या भागाचा हवा तितका विकास आजही झालेला नाही. मात्र, विकासाचा अजेंडा बाजूला ठेवून आजवर या निवडणुकांमध्ये जातीधर्माचे राजकारणच चालत आले आहे.

भिवंडी पश्चिम मतदारसंघात शहरात मुस्लिम मतदार बहुसंख्य आहेत. तर, या मतदारसंघात खोणी, शेलार, काटई, कारिवली या ग्रामीण भागात मोडणाºया गावांचाही समावेश असल्याने या मतदारांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात सुमारे ४० टक्के मतदार हा मुस्लिम समाजाचा असून उर्वरित मतदार हा आगरी, गुजराती, राजस्थानी, जैन, बौद्ध, तेलुगू आणि उत्तर भारतीय असा विभागला गेला आहे. जातीधर्माच्या समीकरणांवर निवडणूक झाल्यास समाजवादी, राष्ट्रवादी, एमआयएम व काँग्रेस पक्षांचे उमेदवार जवळपास मुस्लिम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हक्कांच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

काँग्रेससमोर दुहेरी पेच : एकीकडे मुस्लिम उमेदवारांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारी मतांची विभागणी तर दुसरीकडे भाजपचे तगडे आव्हान, असा दुहेरी पेच काँग्रेससमोर निर्माण होऊ शकतो. भाजपचे आव्हान स्वीकारण्यासाठी या मतदारसंघात काँग्रेसने हिंदू अजेंडा अवलंबविला तर त्याचा फायदा काँग्रेसला निश्चितच होऊ शकतो. कारण, काँग्रेसकडे पारंपरिक व हक्काचा मुस्लिम मतदार आहेच, मात्र शहराबरोबरच ग्रामीण भागातील हिंदू मतदारांची मते आपल्या बाजूला खेचून आणायची असतील, तर काँग्रेसने एखाद्या हिंदू उमेदवाराला संधी दिल्यास काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ या निवडणुकीत काँग्रेस भाजपकडून खेचून घेऊ शकतो. मात्र, त्यासाठी उमेदवारनिवडीचा मोठा पेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण होणार आहे. तर, दुसरीकडे हातात आलेला मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात जाऊ नये म्हणून भाजपनेही या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Web Title: Candidate selection process before Congress in Bhiwandi West;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.