भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीसाठी स्थापन केली महायुती समन्वय समिती, तर जिल्हाध्यक्ष म्हणतात...
By धीरज परब | Updated: December 25, 2025 22:18 IST2025-12-25T22:18:20+5:302025-12-25T22:18:58+5:30
Mira-Bhayander Municipal Elections: अनेक महापालिका निवडणुकीत भाजपा व शिंदेसेना यांच्यात युती झाली असताना मीरा भाईंदर महापालिकेत युती बाबत घोडे अडले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या युती बद्दलच्या बैठकी नंतर चव्हाण यांनी मीरा भाईंदर महापालिका निवडणुक महायुतीची समन्वय समिती गठीत केली आहे.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी मीरा-भाईंदर मनपा निवडणुकीसाठी स्थापन केली महायुती समन्वय समिती, तर जिल्हाध्यक्ष म्हणतात...
- धीरज परब
मीरा रोड- अनेक महापालिका निवडणुकीत भाजपा व शिंदेसेना यांच्यात युती झाली असताना मीरा भाईंदर महापालिकेत युती बाबत घोडे अडले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या युती बद्दलच्या बैठकी नंतर चव्हाण यांनी मीरा भाईंदर महापालिका निवडणुक महायुतीची समन्वय समिती गठीत केली आहे. तसे पत्र भाजपा जिल्हाध्यक्षाच्या नावे दिले आहे. तर आपल्या कडे अजून तरी प्रदेशाध्यक्ष यांचे अधिकृत पत्र आले असून मीरा भाईंदर मध्ये आम्हाला युती नको आहे व ९९ टक्के युती होणार नाही असे मीरा भाईंदर भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या वर्चस्वा वरून भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि शिंदेसेनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात कमालीची जुंपली आहे. २०१७ साली भाजपाचे ६१ तर शिवसेनेचे २२ नगरसेवक निवडून आले होते. नंतर अनेक पक्षांतरे झाली.
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्या नंतर भाजपा आ. मेहतांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट सांगितले होते कि, भाजपा कडे ६५ नगरसेवक असून शिवसेने कडे १७ नगरसेवक आहेत. त्यामुळे ९५ पैकी ६५ जागा भाजपाला आणि १७ जागा शिंवसेनेला व उरलेल्या १३ जागा सम प्रमाणात वाटून घ्यायच्या असा फॉर्म्युला दिला होता.
मेहतांच्या फॉर्म्युल्यावर मंत्री सरनाईक यांनी, शिवसेनेची ताकद वाढली असून ५० टक्के जागा हव्यात असे सांगत महायुती बाबत थेट मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्याशी बोलू असे म्हटले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरारोड येथील सभेत महायुती झाली पाहिजे सांगून वरिष्ठांशी बोलणार असे जाहीर केले होते.
आ. मेहतांनी संकल्प सभा घेऊन त्यात निवडणूक प्रचाराचा नारळ फोडत मंत्री सरनाईक यांच्यावर नाव न घेता आरोप व टीका केली होती. भाजपा स्वबळावर सर्व जागा लढवण्याचे संकेत दिले होते.
मीरा भाईंदर मध्ये टोकाची टीका आणि आरोप प्रत्यारोप भाजपा व शिंदेसेनेत सुरु असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी थेट महायुती समन्वय समिती गठीत करून टाकली आहे. चव्हाण यांनी भाजपा मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांच्या नावे समिती गठीत केल्याचे पत्र दिले असून त्यात शिंदेसेने कडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के आणि मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख राजू भोईर यांचा समावेश आहे. भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जैन सह आ. नरेंद्र मेहता, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास यांना जबाबदारी दिली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष यांचे पत्र मला अजून अधिकृत रित्या मिळालेली नाही. पण जिल्हानिहाय युती बाबत समिती बनवली आहे. महायुती बाबत वरिष्ठ ठरवतील पण ९९ टक्के आम्हाला नाही वाटत युती होईल. आमच्या कडे आधीच ६५ नगरसेवक आहेत. त्या सगळ्यांना एड्जस्ट करायचे आहे. त्यामुळे जागांची कमी जास्त झाली तर मग बाकीच्यांची अडचण होईल. आम्हाला युती नको आहे. युती नाही झाली तरी भाजपा स्वबळावर ७० जागा जिकंण्याची आमची क्षमता असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष जैन यांनी म्हटले आहे.