Awakening for the hat-trick of Awhad | आव्हाडांच्या हॅट्ट्रिकसाठी जागर

आव्हाडांच्या हॅट्ट्रिकसाठी जागर

ठाणे : मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे यंदा सलग तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेचे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र, ते हॅट्ट्रिक साधणार, असा नाराच त्यांच्या समर्थकांनी दिल्याचे चित्र त्यांच्या रॅली, चौकसभा, विविध संस्थांच्या गाठीभेटी, प्रचारसभांतून दिसून आले.


या मतदारसंघात मागील १० वर्षांत केलेल्या विकासकामांची पोचपावती या निवडणुकीत द्यावी, असे आवाहनही आव्हाड करताना दिसत आहेत. त्यामुळे ते आता हॅट्ट्रिक साधणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंब्रा-कळवा मतदारसंघ हा तसा एकीकडे मराठी, तर दुसरीकडे मुस्लिमबहुल वस्तीचा मतदारसंघ म्हणून परिचित आहे. त्याचे १० वर्षांपासून आव्हाड नेतृत्व करीत आहेत. या १० वर्षांत केलेल्या विकासकामांवर ते मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यावर मतदारदेखील अब की बार, फिर से आव्हाड तर म्हणत आहेतच. शिवाय, अब की बार एक लाख पार, अशा घोषणाही त्यांचे समर्थक देताना दिसत आहे. विशेष म्हणजे पुढच्या पाच वर्षांचा अजेंडाही त्यांच्याकडे तयार असून जी कामे प्रस्तावित आहेत, ती मार्गी लावण्याबरोबरच अन्य विकासकामे करण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते आवर्जून सांगतात. सकाळी ६ वाजताच त्यांची खºया अर्थाने प्रचाराला सुरुवात होते. पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, चर्चा कोणावर कोणती जबाबदारी सोपविण्यात आली आहे, मतदारसंघाच्या प्रत्येक भागात कशा पद्धतीने प्रचाराचे काम सुरू आहे, याचा आढावा ते घेतात. त्यानंतर, उन्हातान्हाची जराही पर्वा न करता लहान मुलांसह आबालवृद्धांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना असलेल्या समस्या जाणून घेण्याचे काम ते आवर्जून करताना दिसतात.


ज्या भागात त्यांची प्रचाररॅली जात असते, त्याठिकाणी त्यांचे औक्षण करण्याबरोबरच पुष्पवृष्टी त्यांच्यावर केली जात होती. अब की बार एक लाख पार, असा नारा दिला जात होता. अशा पद्धतीने प्रत्येकाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कशा पद्धतीने योजना आखल्या आहेत, याची माहिती ते देताना दिसतात. एवढा प्रचाराचा थकवा असताना वाटेत लहान मुलाने त्यांना साहेब माझ्याबरोबर फोटो काढता का? असे विचारल्याबरोबर त्यालाही नाराज न करता आव्हाड त्याच्यासोबत हसरा फोटो काढतात. विशेष म्हणजे हा फोटो लगेचच आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसलाही ते ठेवण्यास विसरत नाहीत. दुसरीकडे वृद्ध महिलांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे कामही त्यांच्याकडून होताना दिसते. गुरुवारी सकाळी त्यांनी मुंब्रा येथील जे.के. पाटील कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी मुंब्रा-कौसा परिसरातील विकासाबद्दल गप्पा मारल्या. यावेळी शीतल पाटील या विद्यार्थिनीने जितेंद्र आव्हाड यांना विचारले की, ‘‘कळवा आणि मुंब्रा परिसरात एकही लायब्ररी नाही. यामुळे पुस्तके वाचण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी अडचण होते. यामुळे मुंब्रा परिसरात सुसज्ज लायब्ररी उभारावी’, अशी सूचना केली. कळवा आणि मुंब्रा परिसरात एक अद्ययावत, सुसज्ज, सर्वभाषिक, सर्वतºहेच्या अभ्यासाला पूरक, येथे बसून सर्व विषयांचा शांतपणे, सखोलपणे अभ्यास करता येईल, अशा प्रकारची लायब्ररी उभी करण्यात येणार असल्याचे त्यांनी तातडीने सांगितले. यासाठी मुंब्रा येथे १० गुंठे जागा संपादित केली आहे. तर, कळव्यातही अद्ययावत अभ्यासिका आणि ग्रंथालयासह स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. या दोन्ही वास्तू महाराष्ट्रात आदर्श ठरणार आहेत, असे आव्हाड यांनी सांगितले. यावर विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या घोषणेचे स्वागत केले.


मुंब्रा रेल्वेस्थानकामध्ये सकाळी गर्दीच्या वेळी आव्हाड यांनी भेट दिलेली असतानाही प्रवाशांनी त्यांच्याशी चर्चा केली. मुंब्रा रेल्वेस्थानकाचा केलेला कायापालट, रिक्षास्टॅण्डचा सुटसुटीतपणा, प्रशस्त लॉबी, एम गेटची उभारणी, फेरीवाल्यांचे नियोजन आदींबाबत प्रवाशांनी आव्हाड यांचे आभार मानले. मुंब्रा परिसर सुटसुटीत, आकर्षक व मोकळा केल्याबद्दल रेल्वे प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले. दरम्यान, प्रवाशांनी आव्हाड यांना रेल्वे परिसरातील समस्या सांगितल्या.


रेल्वे प्रवाशांनी मांडल्या समस्या, तत्काळ सोडवण्याचे दिले आश्वासन
च्रेल्वे प्रवाशांच्या समस्या शांतपणे ऐकून त्या तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी दिले. लवकरच सरकते जिने कार्यान्वित करण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले. त्यानंतर, या भागातील धावता दौरा करीत, सर्वांच्या गाठीभेटी घेऊन, दुपारी कळवा येथील कार्यालयात वाट पाहत असलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही त्यांनी घेतल्या.
च्कळवा येथील कार्यालयात आव्हाड यांनी सायंकाळच्या नियोजनाबाबत चर्चा केली. त्यानंतर, पाचपाखाडी येथील कार्यालयात पदाधिकाºयांच्या भेटीगाठी घेतल्या. दुपारी थोडेसे हलकेफुलके खात घरी जाऊन १० ते १५ मिनिटे आराम केला. परंतु, त्यातही त्यांचे फोनवरून पदाधिकाºयांशी बोलणे सुरूच होते.
च्सायंकाळी मुंब्रा, कळवा भागातून रॅली काढण्यात आली. प्रत्येक ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कुठे ढोलताशा, तर कुठे फटाक्यांची आतषबाजी करून ‘अब की बार एक लाख पार’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रात्री १० नंतर दुसºया दिवसाचे नियोजन करण्यात ते व्यस्त होते. रात्री २ वाजता घर गाठले तरी, त्यांच्या चेहºयावर ताण नव्हता.

Web Title: Awakening for the hat-trick of Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.