बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 06:32 IST2026-01-02T06:28:21+5:302026-01-02T06:32:00+5:30
माघार घेणाऱ्या बंडोबांना धनलाभ झाल्याची उघड चर्चा सुरू आहे...

बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना
ठाणे : महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष व फुटकळ पक्षांकडून अर्ज दाखल केलेल्या बंडखोरांना ‘पटवण्याकरिता’ सर्वच पक्षांचे नेते मोबाइल कानाला लावून बसलेत. काही शहरांत बंडखोरांना माघार घ्यायला लावून त्या प्रभागातील निवडणूक बिनविरोध करण्याचा नवा फंडा यावेळी प्रकर्षाने जाणवला. काही बंडखोर आपण पैठण्या, नथी वाटल्याने आपले कसे लाखो रुपये खर्च झालेत, याच्या कहाण्या सांगत असून, रिंगण सोडण्याकरिता मांडवलीस तयार आहेत.
मनापासून बिथरलेले बंडखोर आपला मोबाइल बंद करून अज्ञात स्थळी रवाना झालेत. काही देवदर्शनाला तर काही मित्र-आप्तेष्टांच्या फार्महाऊसवर दडी मारून बसलेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाला स्वीकृत नगरसेवकपदाचे, तर कुणाला परिवहन समितीचे ‘गाजर’ दाखवले जात आहे. अर्ज मागे घेण्यास अजून दोन दिवसांचा कालावधी आहे. सीधी उंगली से घी नही निकला, तर मग जुन्या केसेस, उद्योगांची कंत्राटे रद्द करणे, बांधकामांच्या ओसी-एनओसी रोखणे, असे अनेक हातखंडे अंमलात आणण्याची तयारी ठेवली आहे.
ठाण्यात नाराजांना थंड करण्यासाठी शिंदेसेनेकडून ‘चॉकलेट’ वाटप सुरू आहे. नाराजांना व्हिडीओ कॉल करून, घरी जाऊन त्यांची मनधरणी केली जात आहे. विविध आश्वासनांची खैरात सुरू आहे. एकूण १३१ जागांसाठी १,१२८ उमेदवारांनी अर्ज केले. बंडखोरांना थंड करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे स्वत: व्हिडीओ कॉल करीत आहेत. तसेच खा. नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, राम रेपाळे, शहरप्रमुख हेमंत पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. स्वीकृत नगरसेवकपद, वृक्ष प्राधिकरण, परिवहन समिती, विविध मंडळे आदींचे चॉकलेट दिले जात आहे. भाजपकडून आ. संजय केळकर, निरंजन डावखरे आणि संदीप लेले नाराजांना शांत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. काही नाराज झालेल्यांनी पदांचे राजीनामे दिले. ज्यांना पक्षातून निलंबित केले त्यांना तिकीट देऊ केल्याने, काहींनी थेट नाराजी व्यक्त केली.
कुणाच्या घरी गाडीघोडा; तर कुणाला फक्त फोन
मीरा-भाईंदरमध्ये सर्वाधिक नाराजांची संख्या भाजपत असून त्यांनी शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) आदी पक्षांतून उमेदवारी मिळवली, अनेकजण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
अनेक मातब्बर नाराजांच्या घरी भाजपचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्या गाड्या पोहोचत आहेत, तुलनेनी कमी उपद्रव असलेल्या नाराजांना पक्ष कार्यालयात बोलावून समजूत काढली जात आहे. ज्यांच्या बंडाने फार फरक पडणार नाही त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला जात आहे.
शिंदेसेनेच्या काही नाराजांनी अपक्ष वा उद्धवसेनेत जात उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांचेही मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप, शिंदेसेनेतील अनेक नाराजांनी माघार घेण्यास नकार देत
आपला रोष व्यक्त केल्याचीही चर्चा मीरा-भाईंदरमध्ये आहे.
कल्याण-डोंबिवलीत बंडोबांची समजूत काढायची, त्याला उमेदवारी मागे घ्यायला लावायची आणि निवडणूक बिनविरोध करायची हा फॉर्म्युला भाजप व शिंदेसेनेने अंमलात आणला आहे. भाजपचे पाच आणि शिंदेसेनेचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहे. माघार घेणाऱ्या बंडोबांना धनलाभ झाल्याची उघड चर्चा सुरू आहे.
ज्या बंडखोरांचे मोबाइल नॉट रिचेबल नाहीत, त्यांना फोन करून ‘तुमचे काय ते बोला’, असा थेट सवाल केला जात आहे.
महिलांना वस्तू वाटप करून बसलेले, मंडळांवर वर्गण्यांची खैरात केलेले आपण केलेल्या खर्चाचा हिशेब पटापट सांगत आहेत. त्यांचे रिते झालेले बँक खाते धष्टपुष्ट होईल, याची काळजी घेतली गेल्याचे किस्से कानावर येत आहेत. काहींना महापालिकेत सत्ता आल्यावर कंत्राटे देण्याचे आश्वासन
दिले आहे.
नवी मुंबई महापालिकेत ताईंच्या हाती बंडखोरांची दोरी
भाजपला नवी मुंबईसह पनवेलमध्ये बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. नवी मुंबईत तिकीट वाटपात वनमंत्री गणेश नाईक यांच्या समर्थकांना प्राधान्य देऊन पक्षाने आ. मंदा म्हात्रे समर्थकांची तिकिटे कापली. त्यातील अनिल कौशिक, शार्दूल कौशिक आणि माजी नगरसेवक विक्रम शिंदे, माधवी शिंदेंसह माजी नगरसेविका स्नेहा पालकर, पांडुरंग आमले यांनी बंडखोरी केली. तसेच शिंदेसेनेचे माजी नगरसेवक संजू वाडे यांनी स्वत:सह पत्नी सुरेखा वाडे, मुलगा दीपक वाडे यांचे अर्ज भरले. शिवाय प्रल्हाद पाटील, शुभांगी सूर्याराव, राणी कांंबळे यांनी बंडखोरी कायम ठेवली. त्यामुळे दादांच्या विरोधातील बंडखोरांच्या दोऱ्या ताईंच्या हाती आहेत. पनवेल महापालिकेत भाजपच्या माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील व नीलेश बाविस्कर यांनी बंडखोरी केली. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे शहबाज पटेल यांनी बंडखोरी केली.
उल्हासनगरात सात ते आठ बंडखोरांची शिंदेसेनेला डोकेदुखी
उल्हासनगरात सर्वाधिक बंडखोरी शिंदेसेना व भाजपत झाली. शिंदेसेनेच्या माजी नगरसेविका ज्योती माने, समिधा कोरडे, जयश्री सुर्वे यांच्यासह महिला शहर संघटक मनीषा भानुशाली, स्मिता चिखलकर, उपशहरप्रमुख संदीप गायकवाड, ज्ञानेश्वर मरसाळे आदींना तिकीट नाकारल्याने, त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंड केले. पक्षांनी स्थानिक नेतृत्वावर बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी दिली. मात्र, यापैकी अनेकजण उमेदवारी मागे घेण्याच्या मनःस्थिती नसल्याने, शिंदेसेनेला ७ ते ८ ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपने सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे केले. यामध्ये बाहेरून आलेल्या पक्ष नेत्यांचा उमेदवार म्हणून समावेश केल्याने पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश नाथानी, राजेश टेकचंदानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी दिनेश लहरानी, संजय रामरख्यांनी, योगेश म्हात्रे, नीलेश बोबडे आदींनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त जणांनी उमेदवारी दाखल केली. अनेक बंडखोर अर्ज भरून बाहेरगावी निघून गेले.
वसईत कोण अधिकृत, कोण बंडखोर हेच गुलदस्त्यात
बहुतांश प्रभागांत पक्षांतर्फे उमेदवारी अर्ज भरलेल्या व डमी अर्ज भरलेल्या उमेदवारांबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. उमेदवारी अर्ज भरूनसुद्धा भाजप, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस यांनी आपली यादी जाहीर केलेली नाही.
काही वॉर्डांत बविआ आणि भाजपने दोन ते तीन जणांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरले आहेत. मात्र, यातील पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण हेच अद्याप स्पष्ट होत नसल्याने कोण अर्ज मागे घेणार आणि कोण उमेदवारी कायम ठेवून बंडखोरी करणार हे शुक्रवारी स्पष्ट होईल.
स्थानिक पक्षनेतृत्वाकडून नाराजांची मनधरणी सुरू असून, स्वीकृत नगरसेवकपद, विषय समित्यांवरील संधी तसेच भविष्यातील राजकीय जबाबदाऱ्यांचे आश्वासन देत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भिवंडीत नाराजी दूर करण्यास टावरेंच्या घरी सपकाळ कधी येणार जेवायला?
काँग्रेसचे माजी खा. सुरेश टावरे यांच्या मुलाला काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने टावरे प्रचंड नाराज झाले. काँग्रेसचा एकनिष्ठ असूनही मुलाला तिकीट नाकारल्याने टावरेंची मनधरणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टावरे यांच्या घरी स्वत: येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष टावरेंच्या घरी जेवायला येणार व त्यांची नाराजी दूर करणार, अशी चर्चा भिवंडीत सुरू आहे.
दोन दिवस झाले, पण सपकाळ काही भिवंडीत फिरकले नसल्याने आता टावरेंची नाराजी कशी दूर होणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
काँग्रेसचे एबी फॉर्म आपल्या समर्थकांना उमेदवारी न मिळाल्याने वाटणारे सपचे आ. रईस शेख यांना सपच्या वरिष्ठ नेत्यांकडून फोन येत आहेत. आ. शेख यांनी त्या फोनला प्रतिसाद दिलेला नाही. साहजिकच शेख हे तणावात असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.