बोटाला शाई लावण्यासाठी लागणार ४,५०० मार्कर; निवडणुकीसाठी २ हजार १३ केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:12 IST2025-12-27T10:11:57+5:302025-12-27T10:12:14+5:30
ठाणे पालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून, इच्छुक व संभाव्य उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी प्रभाग समितीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे.

बोटाला शाई लावण्यासाठी लागणार ४,५०० मार्कर; निवडणुकीसाठी २ हजार १३ केंद्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे पालिका निवडणूक शांततेत, निर्भय आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केला जाणार आहे. ठाणे पालिकेतील एकूण ३३ प्रभागांमध्ये २ हजार १३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन याप्रमाणे मार्कर पेन ठेवण्यात येणार असून, पाच टक्के राखीव साठ्यासह सुमारे ४ हजार ५०० मार्कर पेनची जुळवाजुळव सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
ठाणे पालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली असून, इच्छुक व संभाव्य उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी प्रभाग समितीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे. दुसरीकडे, मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पालिका शाळा, पालिकेच्या मालकीच्या इमारती तसेच आवश्यक ठिकाणी मैदानी स्वरूपात मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.
मतदानावेळी अशी असेल प्रक्रिया
मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला मतदान केंद्रात प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर न पुसली जाणारी मार्कर खूण केली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदान केंद्राध्यक्ष (पोलिंग अधिकारी) मतदाराच्या बोटावरील खूण तपासतात.