नेत्याच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्याने घातले १८ किलोमीटर दंडवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:21 IST2019-11-01T15:18:38+5:302019-11-01T15:21:00+5:30
पंढरपुरातल्या कार्यकर्त्याने केला नवस पूर्ण; आमदार शहाजीबापू पाटलांसाठी बोलला होता नवस

नेत्याच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्याने घातले १८ किलोमीटर दंडवत
पंढरपूर : निवडणुकीत आपला नेता विजयी होण्यासाठी अनेक कार्यकर्ते जीवाचे रान करतात. अशाच एका कार्यकर्त्याने आपला नेता विजयी झाल्यानंतर चक्क १८ किलोमीटर दंडवत घालत श्री विठ्ठल-रूक्मिणीकडे केलेला नवस पूर्ण केला.
शिवसेनेचे उमेदवार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघातील सुपली (ता. पंढरपूर) या गावातील बापू जावीर या तरुणाने अॅड. पाटील हे आमदार झाले तर दंडवत घालेन, असा नवस केला होता. पाटील विजयी झाल्यानंतर दुसºयाच दिवशी बापू जावीर या कार्यकर्त्याने १८ किलोमीटर दंडवत घालत श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेकडे नेत्याच्या आमदारकीसाठी केलेला नवस पूर्ण केला.
सांगोला मतदारसंघात अत्यंत चुरस होती. यामध्ये शिवसेनेचे अॅड. शहाजीबापू पाटील विजयी होऊ दे, मी माझ्या गावापासून विठ्ठल-रूक्मिणी मंदिरापर्यंत दंडवत घालीन, असा नवस केला होता. गुरुवारी मतमोजणी झाल्यानंतर अॅड. शहाजीबापू पाटील हे अवघ्या ६७४ मतांनी विजयी झाले. विजयानंतर या तरूणाने शुक्रवारी सकाळी दंडवताला सुरूवात केली आणि १८ किलोमीटर दंडवत घालत विठ्ठल मंदिरापर्यंत जात पूर्ण केला. शहाजीबापू पाटील हे अगोदर काँग्रेसमध्ये होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता शिवसेनेकडून ते विजयी झाले.