भाजप यादीत कोठे समर्थकांचा भरणा; देशमुख म्हणाले, दोन दिवस थांबा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:43 IST2026-01-01T16:39:50+5:302026-01-01T16:43:26+5:30
महापालिका कोणाच्या ताब्यात जाणार : आलुरे, ढेपे, घाडगे, गायकवाड, शेजवाल यांचे पत्ते कापले

भाजप यादीत कोठे समर्थकांचा भरणा; देशमुख म्हणाले, दोन दिवस थांबा !
सोलापूर : महापालिकेसाठी भाजपने मंगळवारी २६ प्रभागातून १०२ उमेदवार निश्चित केले. यामध्ये आ. देवेंद्र कोठे यांच्या ५०हून अधिक समर्थकांचा समावेश आहे. आ. विजयकुमार देशमुख आणि आ. सुभाष देशमुख यांच्या अनेक समर्थकांनी आपली नावे गायब झाल्याचा आरोप केला. दोन दिवस थांबा, उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा दिवस येऊ द्या, मग भेटू, असा इशारा आ. सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिला.
भाजपच्या उमेदवार यादीत प्रभाग ७कडे सर्वांचे लक्ष होते. आ. विजयकुमार देशमुख यांनी येथून श्रीकांत घाडगे, तर आ. कोठे यांनी माजी उपमहापौर पद्माकर काळे यांची नावे पुढे केली होती. अखेर पद्माकर काळे यांचे नाव निश्चित झाले.
प्रभाग १० आणि ११ मधील आठ जागांपैकी निम्म्या जागांवर आ. देशमुखांनी दावा केला होता. मात्र, या प्रभागात आ. कोठे आणि प्रथमेश कोठे यांचा वरचष्मा राहिला. प्रभाग ५ मधून बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी आ. देशमुख यांचे समर्थक राजू आलुरे, विनय ढेपे यांनी भाजप कार्यालयात गोंधळ घातला स्थानिक विरुद्ध बाहेरचा संघर्ष भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या शिफारशीनुसार प्रभाग १२मधून अर्चना वडनाल यांना उमेदवारी मिळाली. मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या शिफारशीनुसार प्रभाग २१मधून सात्विक बडवे, मंजिरी किल्लेदार यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. मात्र, यातून या प्रभागात स्थानिक विरूद्ध बाहेरचे उमेदवार असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत.
हा गोंधळ कामी आला नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रभागातून प्रधाने आणि तोडकरी यांनाच उमेदवारी दिली. या घडामोडींमुळे देशमुख गटात वेगळ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. दोन दिवसानंतर काय घडेल याकडे लक्ष आहे.
आमची तीन नावे गायब केली : खटके
प्रभाग ६मधून आ. देशमुख यांचे समर्थक सुनील खटके यांना उमेदवारी मिळाली. मात्र, खटके म्हणाले, आ. देशमुख यांनी या प्रभागातून कीर्ती शिंदे, केदार कराळे, सुदर्शना चव्हाण यांना एबी फॉर्म द्यायला सांगितले. ही नावे गायब झाली. हा विश्वासघात आहे.
माजी आमदार दिलीप माने १ गटाला एकही जागा देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्याचे आ. सुभाष देशमुख सांगत होते.
प्रत्यक्षात माने गटाला प्रभाग ३ २५मध्ये दोन आणि प्रभाग २६मधून एक जागा अशा एकूण तीन जागा देण्यात आल्या. माने गटाचे दोन उमेदवार बुधवारी देशमुख गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.
आत्मदहनाचा इशारा देणाऱ्याला डावलले
आ. सुभाष देशमुख यांनी प्रभाग २२मधून शीतल गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली होती. आ. कोठे यांनी या प्रभागातून किसन जाधव, नागेश गायकवाड यांना प्रवेश दिला. मला उमेदवार न दिल्यास आत्मदहन करेन, असा इशारा शीतल गायकवाड यांनी दिला होता. या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून या प्रभागात किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या कुटुंबातील अंबिका गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग २३मधून आ. देशमुख यांचे समर्थक अमोल गायकवाड यांना डावलण्यात आले. कोठे समर्थक वाकसेंना उमेदवारी दिली.
सारिका सुरवसे, सुनीता कोळेकर यांना धक्का
प्रभाग २१मधून सारिका सुरवसे, सुनीता कोळेकर यांची नावे निश्चित झाल्याचे निरोप आले. प्रत्यक्षात संगीता जाधव, मंजिरी किल्लेदार यांची नावे आली. त्यातून सुरवसे आणि कोळेकर हे दोघेही भाजप नेत्यांवर भडकल्याचे दिसून आले.