सोलापूर: 'बिनविरोध'चा खेळ संपला! पालिका निवडणुकीसाठी अखेर १०२ जागांसाठी ५६४ उमेदवार रिंगणात
By आप्पासाहेब पाटील | Updated: January 3, 2026 18:06 IST2026-01-03T18:05:59+5:302026-01-03T18:06:35+5:30
Solapur Municipal Election 2026: शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत चिन्ह वाटपाची कार्यवाही पूर्ण, अंतिम यादी प्रसिद्ध

सोलापूर: 'बिनविरोध'चा खेळ संपला! पालिका निवडणुकीसाठी अखेर १०२ जागांसाठी ५६४ उमेदवार रिंगणात
Solapur Municipal Election 2026 आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या २०२५–२६ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या १०२ जागेसाठी ५६४ उमदेवार रिंगणात उभे राहिले आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत चिन्ह वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यालयाने अंतिम उमदेवारांची यादी शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली.
दरम्यान, भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना महापालिका निवडणुकीत काटेकोरपणे राबविण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या १०२ जागेसाठी १४६० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननीच्या प्रक्रियेत २७० उमेदवारांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राबविण्यात आलेल्या अर्ज माघारीच्या दिवशी सोलापुरातील ५३२ उमदेवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ५६४ उमेदवार उरले आहेत.
सोलापुरात भाजपा १०२ जागेवर निवडणूक लढवित आहे. शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने युती केल्याने ते दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस व ठाकरेसेना ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरी जात आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, एमआयएम, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासह अन्य पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.