भाजपकडून ३२ उमेदवारांच्या एबी फॉर्मला उशीर; कल्याणशेट्टी, तडवळकरांना रोखले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:26 IST2025-12-31T12:25:40+5:302025-12-31T12:26:28+5:30
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता. भाजपची उमेदवारांची यादी दुपारी तीन वाजेपर्यंत जाहीर झालेली नव्हती. अर्ज भरण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ होती.

भाजपकडून ३२ उमेदवारांच्या एबी फॉर्मला उशीर; कल्याणशेट्टी, तडवळकरांना रोखले
सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे आठ प्रभागांतील ३२ उमेदवारांचे एबी फॉर्म दुपारी तीन वाजता आले. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर हे सर्वजण आले असा आरोप करीत शिंदेसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एबी फॉर्म घेऊन आलेले आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना निवडणूक कार्यालयाबाहेर रोखले. त्यामुळे निवडणूक कार्यालयाबाहेर बराच गोंधळ झाला. या गोंधळामुळे भाजपच्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता. भाजपची उमेदवारांची यादी दुपारी तीन वाजेपर्यंत जाहीर झालेली नव्हती. अर्ज भरण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ होती. आ. सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे दुपारी २:४० वाजता नॉर्थकोट प्रशालेतील निवडणूक कार्यालयांमध्ये दाखल झाल्याचा आरोप करण्यात आला. चार निवडणूक कार्यालयातील एबी फॉर्म दिल्यानंतर हे नेते निवडणूक कार्यालय क्र. २ च्या समोर दाखल झाले. येथे वेळ संपल्यानंतर अधिकाऱ्यांनी दरवाजा बंद केला. निवडणूक कार्यालयाबाहेर थांबलेले शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी आणि कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना कार्यालयाबाहेर रोखले.
बेकायदेशीरपणे आत जाऊ नका. कायद्याचे उल्लंघन करू नका, अशी मागणी करीत घोषणाबाजी केली. पोलिस आयुक्त एम राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, गौहर हसन यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, आंदोलन थांबले नाही.
कार्यालयातील घटनाक्रम..
आ. सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे दुपारी २:४० वाजता नॉर्थकोट प्रशालेतील निवडणूक कार्यालयांमध्ये दाखल झाले.
दुपारी २:४५ ते २:५० यादरम्यान निवडणूक कार्यालय क्र. ७, ५ मध्ये जाऊन एबी फॉर्म दिल्याची पोहोच घेतली. २:५० ते २:५५ यादरम्यान निवडणूक कार्यालय क्र. १ आणि ३ मधील उमेदवारांच्या एबी फॉर्मची पोहोच घेतली. दुपारी ३ च्या सुमाराला भाजप नेते निवडणूक कार्यालय क्र. २ आणि ४ या ठिकाणी पोहोचले. या दोन निवडणूक कार्यालयात ५, ६, ७, १५ आणि १०, ११, १२, १३ अशा एकूण आठ प्रभागातील उमेदवारांचे अर्ज देणे बाकी होते.