solapur-city-central Election Results 2019: praniti shinde vs Dilip Mane, mahesh kothe,shivsena, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | ‘प्रणितीं’चं काम बोललं; कारण लोकांनी आयाराम - गयारामांना ओळखलं...

‘प्रणितीं’चं काम बोललं; कारण लोकांनी आयाराम - गयारामांना ओळखलं...

ठळक मुद्देशहर मध्यसाठी अटीतटीने लढत झाली, एकूण २० उमेदवार रिंगणात होतेशहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली‘एमआयएम‘चे उमेदवार फारुक शाब्दी यांचा १२ हजार ७१८ मतांनी पराभव केला

राकेश कदम

सोलापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्याप्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. त्यांनी ‘एमआयएम‘चे उमेदवार फारुक शाब्दी यांचा १२ हजार ७१८ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार महेश कोठे तिसºया तर शिवसेनेचे दिलीप माने चौथ्या क्रमांकावर राहिले. प्रणिती शिंदे या गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात करत असलेल्या विकासकामांमुळे त्यांना हा विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले; तर आयाराम - गयाराम यांना मतदारांनी नाकारले.

शहर मध्यसाठी अटीतटीने लढत झाली. एकूण २० उमेदवार रिंगणात होते. एकूण एक लाख ६७ हजार ५६९ मतदारांनी मतदान केले. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे,  एमआयएमचे फारुक शाब्दी, शिवसेनेचे दिलीप माने, माकपचे नरसय्या आडम, अपक्ष उमेदवार महेश कोठे यांच्यात प्रमुख लढत झाली. 

काँग्रेसची शिवसेनेसोबत टक्कर असेल असे वातावरण तयार करण्यात आले होते, परंतु काँग्रेस आणि ‘एमआयएम’मध्ये मुख्य लढत झाली. मागच्या निवडणुकीतही अशीच लढत झाली होती. यंदा ‘एमआयएम’ दुसºया स्थानी तर अपक्ष उमेदवार महेश कोठे तिसºया क्रमांकावर राहिले. शिवसेना चौथ्या तर नरसय्या आडम पाचव्या क्रमांकावर राहिले.

सकाळी ९ वाजता मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली. प्रणिती शिंदे यांना २४४७, फारुक शाब्दी यांना १७४१, दिलीप माने यांना १६७३ तर महेश कोठे यांना १५९८ मते मिळाली होती.  

दुसºया फेरीत फारुक शाब्दी यांना सर्वाधिक ६८४२ तर प्रणिती शिंदे यांना ३५८२ मते मिळाली. दिलीप माने यांना २४४३ तर महेश कोठे यांना २४१६ मते मिळाली. तिसºया आणि चौथ्या फेरीत शाब्दी यांना पुन्हा मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसचे काही पदाधिकारी गांगरुन गेले. ‘थोडे थांबा आपला भाग सुरू होईल तेव्हा शाब्दींच्या मताधिक्यात घट होईल’, असे वरिष्ठ पदाधिकारी सांगू लागले. दुसºया आणि तिसºया फेरीत बेगम पेठ, सिद्धेश्वर पेठ, इक्बाल मैदान, शनिवार पेठ, किडवाई चौक,  भारतीय चौक या भागातील मतपेट्यांचा समावेश होता. 

चौथ्या आणि पाचव्या फेरीत अशोक चौक, न्यू पाच्छा पेठ, शांती चौक, कसबे सोलापूर, समाधान नगर, सुनील नगर या भागातील मतपेट्यांचा समावेश होता. या भागातून फारुक शाब्दी आणि महेश कोठे यांना मताधिक्य मिळाले. प्रणिती शिंदे तिसºया तर दिलीप माने चौथ्या क्रमांकावर होते. दहाव्या फेरीपर्यंत महेश कोठे आणि त्यानंतर फारुक शाब्दी यांचे मताधिक्य कायम होते. पूर्व भागातून महेश कोठे यांना चांगली साथ मिळाली आहे. 

उमेदवारनिहाय मिळालेली मते 
- प्रणिती शिंदे ५१ हजार ४४०, एमआयएमचे फारुक शाब्दी ३८ हजार ७२१, अपक्ष महेश कोठे ३० हजार ८१, शिवसेनेचे दिलीप माने २९ हजार २४७,  नरसय्या आडम  १० हजार ५०५, बसपाचे राहुल सर्वगोड ७६९, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज पिरजादे २७६७, आपचे खतीब वकील २२०, हिंदुस्थान जनता पार्टीचे गौस कुरेशी ४०८, अपक्ष उमेदवार - अशोक माचन ३२५, उमेश करपेकर १५१, कल्याणी हलसंगी ३६८, दीपक गवळी ४२०, नागमणी जक्कन २०२, बशीर अहमद शेख ४५७, मनीष गायकवाड ३३९, राजेंद्र रंगरेज २२७, अ‍ॅड. विक्रम कसबे १००, सचिन मस्के २७७.  नोटा : ८०७. 

बघा आम्ही म्हणालो होतो की नाय...
- अकराव्या फेरीत रामवाडी, लक्ष्मी-विष्णू चाळ, सुभद्रा नगर, सेटलमेंट, लिमयेवाडी या भागातील मतपेट्या उघडण्यात आल्या. या फेरीअखेर प्रणिती शिंदे यांना २३ हजार ३४२, महेश कोठे यांना २१ हजार ६९८, फारुक शाब्दी यांना २० हजार ५३६ तर दिलीप माने यांना १६ हजार ३५५ मते मिळाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या नऊ फेºयांमध्ये मागे असलेल्या प्रणिती शिंदे यांनी कोठे यांच्यापेक्षा १६४४ मतांची आघाडी घेतली. चेतन नरोटे मतमोजणी केंद्रातून बाहेर आले. तिथूनच त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना फोन लावला. बघा आम्ही म्हणालो होतो की नाय. मागच्या निवडणुकीत ९ व्या फेरीनंतरच मताधिक्य मिळाले होते. आताही तसेच घडले, असे नराटे यांनी पत्रकारांना सांगितले. इथून जवळपास सर्वच फेºयांमध्ये प्रणिती शिंदे आघाडीवर राहिल्या. 

प्रणिती शिंदे यांच्या विजयाची कारणे 
- थेट मतदारांशी नियमित संपर्क, विविध जाती-धर्मातील पुढारी आणि कार्यकर्त्यांचा मेळ घालून राबविलेली प्रचार यंत्रणा, महिला आणि विद्यार्थिनी यांना दिलेला विश्वास, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन केलेले काम, निवडणुकीची ‘डोकेबाज’ रणनीती या जोरावर प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवल्याचे मानले जात आहे.

इतरांच्या पराभवाची कारणे 
- दिलीप माने यांनी ऐन निवडणुकीत काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. मतदारसंघाशी नियमित संपर्क नव्हता. ऐनवेळी यंत्रणा उभारली. बहुभाषिक मतदारांना विश्वास देण्यात अपयश आले. फारुक शाब्दी यांच्या उमेदवारीवर एमआयएमचे नगरसेवक, पदाधिकारी नाराज राहिले. शाब्दी यांची यंत्रणा विस्कळीत होती. सोबतचे सहकारी सतत भांबावलेले होते. अपक्ष म्हणून महेश कोठे यांच्यावर मर्यादा आल्या. ठोस मुद्यावर प्रचार केंद्रीत करता आला नाही. ठराविक लोक सोबत राहिले. त्यामुळे वातावरण निर्मिती झाली नाही.  माकपचे नरसय्या आडम यांनी सुरुवातीला वातावरण तापविले होते. अभिजन, नवमतदार माकपपासून दूर राहिला. 

Web Title: solapur-city-central Election Results 2019: praniti shinde vs Dilip Mane, mahesh kothe,shivsena, Maharashtra vidhan sabha election Results 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.