धक्कादायक; दोन लहान मुलांसह महिलेची आत्महत्या; विहिरीत उडी मारून संपवली जीवनयात्रा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:56 IST2020-05-12T12:52:23+5:302020-05-12T12:56:17+5:30
भोयरे (ता. मोहोळ) येथील घटना; मुलाचा मृतदेह हाती लागेना, गावावर शोककळा...!

धक्कादायक; दोन लहान मुलांसह महिलेची आत्महत्या; विहिरीत उडी मारून संपवली जीवनयात्रा...!
मोहोळ : अज्ञात कारणावरुन एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी१२ मे रोजी रात्री भोयरे (ता. मोहोळ)येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे भोयरे येथील विकास भाऊराव साठे यांचे शेतातील विहिरीत स्वाती कैलास साठे (वय ३०) या महिलेने आपल्या अभिजीत कैलास साठे (वय ६), परी कैलास साठे (वय ४ वर्ष ) या दोन चिमुकल्यांसह विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत भोयरेचे पोलीस पाटील नागेश काकासाहेब पाटील यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अज्ञात कारणावरून एका महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल पोपळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर महिलेचा व मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला, परंतु दुपारपर्यंत मुलाचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नव्हता पोलिसांचे शोधकार्य चालू आहे.