Search campaign for Congress candidate to fight Subhash Deshmukh | सुभाष देशमुख यांच्याशी लढत देण्यासाठी काँग्रेसमध्ये उमेदवाराची शोधमोहीम सुरू
सुभाष देशमुख यांच्याशी लढत देण्यासाठी काँग्रेसमध्ये उमेदवाराची शोधमोहीम सुरू

नारायण चव्हाण

सोलापूर : सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व केलेले काँग्रेसचे दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला शोधमोहीम हाती घ्यावी लागत आहे. शिवाय काँग्रेसचेच बाळासाहेब शेळके आणि राजशेखर शिवदारे अन्य पर्यायाचा शोध घेत असल्यामुळेही पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.

सोलापूर शहराचा हद्दवाढ भाग, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५६ गाव आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ गावांचा मिळून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ बनला आहे. पुनर्रचित सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाने जातीपातीची समीकरणे खोडून काढली आहेत. शहरी मतदारांचा प्रभाव या मतदारसंघात दिसून येतो. ग्रामीण भागाचे राजकारण संपुष्टात आल्याने सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा समन्वय साधणाऱ्या उमेदवारासाठी हा मतदारसंघ अधिक सोयीचा ठरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण चेहºयाच्या उमेदवारांना त्यांची अनामत राखता आली नाही. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी नुकतेच शिवसेनेत पक्षांतर केले आहे. सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिण या दोन्ही मतदारसंघात त्यांची चाचपणी सुरू आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी सहकारमंत्र्यांचा अंतर्गत संघर्ष असल्याने त्यांना शह देण्याची संधी पालकमंत्री सोडत नाहीत. यावेळी श्रीशैल हत्तुरे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून तुल्यबळ उमेदवार देता आला नाही तर तिसºया आघाडीला बळ देण्याचा प्रयत्न काँग्रेसचे असंतुष्ट नेते करीत आहेत.

मतदारसंघात विकासाच्या अनेक योजना आणून आपल्या राजकारणाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न सुभाष देशमुख यांनी केला आहे. संपर्कातही ते आघाडीवर आहेत.

पाच वर्षांत काय घडले?

  • मुख्यमंत्री सडक योजनेतून मोठा निधी मिळून रस्त्यांची कामे मार्गी लागली. ग्रामीण आणि सोलापूर शहर हद्दवाढ भागात पक्के रस्ते झाले.
  • मंद्रुप येथील सीतामाई तलावात उजनीतून पाणी आणण्याची योजना मंजूर करून त्यासाठी निधीची तरतूद. या योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे
  • ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंद्रुप येथे एमआयडीसी मंजूर. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
  • सुभाष देशमुख यांनी स्थापन केलेल्या ‘लोकमंगल’वर दूध भुकटीप्रकरणी गुन्हा दाखल
  • मतदारसंघातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब शेळके यांच्या तिसºया आघाडीसोबत बैठका सुरू

 

मुख्यमंत्र्यांनी मला सढळ हाताने निधी दिल्याने या मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. अनेक प्रलंबित प्रश्न हाती घेतले आणि ते तडीस नेले आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, सिंचनाच्या कामावर मतदार योग्य निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. - सुभाष देशमुख , सहकारमंत्री

Web Title: Search campaign for Congress candidate to fight Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.