कोरोनामुळे गणेशोत्सवावरही निर्बंध; यंदा ६० टक्के मंडळांना परवानगी नाकारली

By appasaheb.patil | Published: August 20, 2020 12:40 PM2020-08-20T12:40:08+5:302020-08-20T12:46:17+5:30

सोलापूर ग्रामीण पोलीस दल अलर्ट; २६५९ पैकी १0८६ ठिकाणीच गणपतींची प्रतिष्ठापना

Restrictions on Ganeshotsav due to corona; This year, 60 per cent boards were denied permission | कोरोनामुळे गणेशोत्सवावरही निर्बंध; यंदा ६० टक्के मंडळांना परवानगी नाकारली

कोरोनामुळे गणेशोत्सवावरही निर्बंध; यंदा ६० टक्के मंडळांना परवानगी नाकारली

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे वर्षानुवर्षे प्रतिष्ठापना करीत असलेल्या मंडळांनाच यंदा गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात येत आहेमंडळांना सार्वजनिक ठिकाणी, चौकात, रस्त्यावर मंडप घालून गणेशमूर्तीची स्थापना करण्यास परवानगी नाहीकोणत्याही प्रकारे स्टेज, मंडप उभारता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत

सोलापूर : कोरोना महामारीमुळे यंदा लाडक्या बाप्पांच्या उत्सवावरही निर्बंध लादण्यात आले आहेत़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय जिल्हा व पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार यंदा सोलापूर जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गतवर्षी २ हजार ६५९ पैकी १ हजार ८६ सार्वजनिक गणपती मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत यंदा १ हजार ५७३ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी नाकारल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही, कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबतची जिल्हा व पोलीस प्रशासनाने काळजी घेतली आहे.

ग्रामीण भागात वाढत्या कोरोनाची परिस्थिती पाहता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना देण्यासाठी सध्या जिल्ह्यातील विविध भागात ग्रामीण पोलिसांच्या शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात येत आहेत़  या बैठकीत कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महापालिका, नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे गणेश मंडळांना बंधनकारक आहे.

गावागावातील संबंधित मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, गणेशमूर्ती बनविणारे कारागीर, स्टॉलधारक, मंडप कॉन्ट्रॅक्टर, साऊंड सिस्टीम कारागीरांना मार्गदर्शन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या  सूचना देण्यात येत असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

३१८ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

  • - गावांमध्ये गणेशोत्सव काळात गट-तट निर्माण होऊन वाद निर्माण होतात. त्यातून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात येत आहे. 
  • - सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फ त हद्दीतील गावांमध्ये बैठक घेऊन ‘एक गाव, एक गणपती’संदर्भात प्रबोधन करण्यात आले. त्यानुसार यंदा जिल्ह्यातील २५ पोलीस स्टेशन हद्दीतील ३१८ गावांमध्ये एकच गणपती बसविण्यात येणार आहे. मागील वर्षी २ हजार ६५९ श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तसेच २९४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ योजना राबविण्यात आली होती.

पोलीस पाटलांची घेतली मदत...
कोरोनामुळे वर्षानुवर्षे प्रतिष्ठापना करीत असलेल्या मंडळांनाच यंदा गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात येत आहे. याबाबतची कोणत्या गावात किती सार्वजनिक मंडळे आहेत, कायमस्वरूपात कोणत्या मंडळांचा गणपती आहे यासह अन्य माहिती संबंधित पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेने पोलीस पाटलांच्या मदतीने संकलित केली होती़ त्यानुसार ज्या मंडळाची गणेशमूर्ती कायम स्वरूपात बसविण्यात येते त्याच मंडळांना परवानगी देण्यात येत असल्याचे सांगितले.

१ हजार ५७३ मंडळांना परवानगी मिळणार नाही...
मंडळांना सार्वजनिक ठिकाणी, चौकात, रस्त्यावर मंडप घालून गणेशमूर्तीची स्थापना करण्यास परवानगी नाही. श्री गणेश मंदिरे किंवा कायमस्वरूपी गणेशमूर्ती ठेवलेल्या ठिकाणी स्थापना करता येईल. मात्र कोणत्याही प्रकारे स्टेज, मंडप उभारता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत़ त्यामुळे यंदा ग्रामीण भागात चौकात, रस्त्यावर मंडप घालून प्रतिष्ठापना करणाºया १ हजार ५७३ मंडळांना परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, याबाबत जिल्ह्यातील सर्वच गणेश मंडळांना सूचना देण्यात येत आहेत़ जमा झालेल्या वर्गणीचा उपयोग सामाजिक कार्यासाठी खर्च करावा, शासनाने वेळोवेळी दिलेल्या विविध सूचना, आदेशांचे पालन करावे, गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे़
- अतुल झेंडे,
अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलीस

Web Title: Restrictions on Ganeshotsav due to corona; This year, 60 per cent boards were denied permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.