सांगोला तालुक्यात रानगव्याचा धुडगूस; कमलापूर येथे धडक दिल्याने म्हैस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 17:39 IST2021-02-23T17:39:29+5:302021-02-23T17:39:37+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

सांगोला तालुक्यात रानगव्याचा धुडगूस; कमलापूर येथे धडक दिल्याने म्हैस जखमी
सांगोला : सोलापूर जिल्ह्यात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असताना कमलापूर-अनुसेमळा (ता. सांगोला) येथे सोमवारी अचानक भल्या मोठ्या रानगव्याने धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, रानगव्याने धडक दिल्याने म्हैस जखमी झाली.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, मोहोळ, माढा, पंढरपूर, आदी तालुक्यांत हिंस्र प्राण्याने जनावरे, माणसावर हल्ला केल्याने भीतीचे वातावरण कायम आहे. अशातच सांगोला तालुक्यातील महूद, ठोंबरेवाडी, महिम, कारंडेवाडी परिसरात हिंस्र प्राण्याने हल्ला केल्यामुळे शेळ्या-मेंढ्या, जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्याने शेतकरी ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, सोमवारी सायं. ५.१५ च्या सुमारास कमलापूर अंतर्गत अनुसेमळा येथे विनायक अनुसे या तरुणास त्यांच्या मक्याच्या पिकात भल्यामोठ्या रानगव्याचे दर्शन झाले.
रानगव्याने अचानक सैरभैर धावत धुडगूस घालत असताना त्याने विनायक अनुसे यांच्या म्हशीला धडक दिल्याने खरचटले आहे, तर परिसरातील पिकांतून सैरभैर पळत सुटल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.