No stone address .. No count for pits ... | खडीचा नाही पत्ता.. खड्ड्यांची नाही गिनती ....
खडीचा नाही पत्ता.. खड्ड्यांची नाही गिनती ....

ठळक मुद्देपंढरपूर तालुका - इकडंबी खड्डा अन् तिकडंबी तीच स्थिती, जायचं कसं सांगाबार्शीला जोडणारा एकही रस्ता नाही धडधाकटअक्कलकोट तालुक्यात खड्डे इतके की गावात पोहोचायला लागतो तिप्पट वेळ 

सोलापूर : दळणवळणाच्या दृष्टीने राज्य-महामार्ग, खेडोपाड्यांचे रस्ते हे मुख्य श्वास म्हणून ओळखले जातात; मात्र हे केवळ कागदोपत्री आहे की काय असा प्रश्न आता गावगड्यापासून ते शहरांपर्यंत सर्वांनाच पडू लागला आहे. लालफितीच्या कारभारामध्ये रस्ता नावाच्या कामासाठी प्राधान्य द्यावे लागते हे कुणाच्याच गावी नसावे, अशी स्थिती जिल्हाभरात ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुन्हा पुन्हा  मलमपट्टी करायची.. लाखो रुपयांचा चुराडा.. प्रत्यक्ष एका पावसातच रस्त्याची वाट लागते, अशा बोलक्या प्रतिक्रिया गावोगावच्या तरुणाईपासून वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या आजोबांपासून व्यक्त करण्यात आल्या. वर्षात एकाच मार्गावरील रस्त्यावर तीन-तीन वेळा दुरुस्ती करायची आणि बिले उचलायची अशीही तºहा असल्याचेही लोकांमध्ये कुजबुज आढळून आली. या साºया प्रकारामध्ये काही अपवाद वगळले तर खडीचा पत्ता नाही.. खड्ड्यांची तर गिनतीच नाही. अनेक ठिकाणी कधीकाळी केलेले डांबरी केव्हाच वाहून गेल्याचे चित्र दिसून आले. 

पंढरपूर तालुका - इकडंबी खड्डा अन् तिकडंबी तीच स्थिती, जायचं कसं सांगा
पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रोज हजारोंच्या संख्येने भाविकांची ये-जा असते़ मात्र शहराला जोडणारे रस्ते खड्डेमय बनले आहेत़ वाखरी परिसरात एक दुचाकीस्वार खड्डा चुकविताना गाडीवरून पडला़ त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘अहो साहेब, इकडंबी खड्डा अन् तिकडंबी तीच स्थिती, जायचं कसं सांगा’ असा सवाल केला़ या नागमोडी वळणे घेण्याच्या नादात गाडी घसरून पडल्याचे त्यांनी सांगितले़

बार्शीला जोडणारा एकही रस्ता नाही धडधाकट
बार्शी : मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या बार्शी शहरातून सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, परांडा, भूम, मोहोळ या चारही दिशेला जाणाºया राज्य, जिल्हा व ग्रामीण मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. या सर्वच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे हे अंतर काटण्यासाठी तिप्पट वेळ लागत आहे़ तसेच वाहनधारकांना वाहन चालवताना देखील कसरत करावी लागत आहे़ या प्रकारामुळे गावोगावच्या नागरिकांपासून वाहनधारक वैतागले आहेत. बार्शी हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी एक व्यापारीपेठ आहे. शहरात नेहमीच वाहनांची सतत वर्दळ असते़ शहरातील रस्ते तर भुयारी गटारी योजनेच्या कामांमुळे खराब झालेच आहेत; मात्र बार्शी शहरात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी केवळ लातूर-कुर्डूवाडी हा राज्यमार्ग सोडला तर एकही रस्ता सुस्थितीत नाही़ मागील वर्षी या रस्त्याचे काम झाल्यामुळे तो चांगला आहे़ 

अक्कलकोट तालुक्यात खड्डे इतके की गावात पोहोचायला लागतो तिप्पट वेळ 
अक्कलकोट :  तालुक्यात बोटावर मोजण्याइतकेच रस्ते चांगले आहेत.  बहुतांश रस्ते अर्थात तालुक्यातील एकूण ३०० किलोमीटर रस्ते अत्यंत खराब झाले आहेत़ जीवनवाहिनी समजल्या जाणाºया रस्त्यांची चांगलीच वाट लागली आहे. यामुळे दळणवळणाचे प्रमाण घटले आहे़ तडवळसह इतर भागात जैसे थे स्थिती आहे़ मागील ७ वर्षांत या रस्त्यांची स्थिती सुधारलेली नाही. या खराब रस्त्यांकडे लोकप्रतिनिधी ना अधिकारी कोणीच वाली राहिलेला नसल्याची खंत तालुकावासीयातून व्यक्त होत आहे.

करमाळा - वर्षातून झाली तीनवेळा रस्त्याची डागडुजी
करमाळा : परतीच्या पावसाने अहमदनगर-टेंभुर्णी राज्यमार्गावरील कंदर ते जातेगाव व करमाळा ते पुणे मार्गावर वीटदरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षभरात तीन वेळा रस्त्याच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करूनसुध्दा रस्त्यावर खड्डे कसे काय पडतात, असा सवाल नागरिकांसह वाहनचालकांमधून होत आहे.  अहमदनगर ते जातेगावपर्यंतचा संपूर्ण ७५ कि.मी.च्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. साईडपट्ट्या उखडल्या आहेत. अहमदनगरहून करमाळ्यास येण्यासाठी चांगला रस्ता असताना दीड तास वेळ लागायचा, पण आता खड्ड्यांमुळे तीन तास लागत आहेत. 

माढा - टाकला मुरुम बुजवले खड्डे ; खेड्यांना जोडणाºया रस्त्यांची लागली वाट

कुर्डूवाडी : पडलेल्या परतीच्या पावसामुळे माढा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते आहे़ शहरांना जोडणारे काही मुख्य मार्ग वगळता खेड्यांना जोडणारे बहुतांश मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत त्यांची वाट लागली आहे. दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

Web Title: No stone address .. No count for pits ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.