Hey surprise Anniversary of theft was celebrated in Karmala as the investigation took place | अहो आश्चर्यम्; तपास लागेना म्हणून करमाळ्यात साजरा केला चोरीचा वर्षपूर्ती दिन

अहो आश्चर्यम्; तपास लागेना म्हणून करमाळ्यात साजरा केला चोरीचा वर्षपूर्ती दिन

ठळक मुद्दे- करमाळा शहरातील भवानी नाक्यावरील सोसायटीत झाली होती चोरी- चोरी होऊन वर्ष लोटले तरी तपास करण्यास पोलीसांना आले अपयश- चोरीच्या वर्षपुर्ती कार्यक्रमाची करमाळा शहरात जोरदार चर्चा

करमाळा : गतवर्षी झालेल्या चोरीला १८ फेब्रुवारीच्या दिवशी वर्ष होत असताना तपास न लागल्याने करमाळ्यात बन्सी यादव नामक तक्रारकर्त्यांनी सोमवारी पूर्वसंध्येला वर्षपूर्ती दिन साजरा करून पोलीस खात्याचा निषेध केला. वर्ष लोटले तरी तपास लागत नसल्याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली.

करमाळा शहरातील भवानी नाक्यावरील विकी हौसिंग सोसायटीत राहणारे कैलास बन्सी यादव हे आपल्या घरासमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बँक आॅफ इंडियाचे ग्राहक सुविधा केंद्र चालवितात. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी ते सकाळी १० वाजता घराला कुलूप लवून ग्राहक सेवा केंद्रात गेले. दुपारी चोरट्याने घर फोडून कपाटातील ४३ हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेले. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांत भादंवि ४५४ अन्वये गुन्हा दाखल झाला.

चोरी होऊन वर्ष उलटत असताना वर्षभरात चोरीचा तपास लागला नाही. वर्षभरात एकदाही पोलिसांनी आपणास तपासासंदर्भात कधी विचारणा केली नाही. उलट मी वारंवार पोलीस ठाण्यात हेलपाटे मारले, पण कुणीच लक्ष दिले नाही. याबद्दल मला आजही आश्चर्य वाटते म्हणून मी या चोरीच्या घटनेची वर्षपूर्ती तीव्र दु:ख व्यक्त करून करीत असल्याचे कैलास बन्सी यादव यांनी सांगितले.
दरम्यान, वर्ष उलटून गेले तरी चोरीचा तपास न लागल्याने बन्सी यादव यांनी अवलंबविलेल्या या चोरीच्या वर्षपूर्ती उपक्रमाची शहरभर एकच चर्चा सुरू होती. चोरीचा गुन्हा नोंदल्यानंतर पोलिसांकडून साधी चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवले  नाही याबद्दल या वर्षपूर्ती निषेध उपक्रमानंतर चर्चा सुरु झाली आहे.  

Web Title: Hey surprise Anniversary of theft was celebrated in Karmala as the investigation took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.