माजी सैनिक आक्रमक; आमदार प्रशांत परिचारकांच्या गाडीवर फेकले ऑइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 14:10 IST2021-11-09T14:08:41+5:302021-11-09T14:10:55+5:30
एका माजी सैनिकाने आ. प्रशांत परिचारकांची गाडी अडवून गाडीवर ऑइल फेकून भारत की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या.

माजी सैनिक आक्रमक; आमदार प्रशांत परिचारकांच्या गाडीवर फेकले ऑइल
कुर्डूवाडी : देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ कुर्डुवाडी - बार्शी रोडवर रिधोरे (ता.माढा) येथे एका माजी सैनिकाने आ. प्रशांत परिचारकांची गाडी अडवून गाडीवर ऑइल फेकून भारत की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. बापू गायकवाड असे माजी सैनिकाचे नाव असल्याचे समजते. ही घटना मंगळवार ९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास घडली.
मागील काही वर्षापूर्वी पंढरपुर तालुक्यातील जाहीर सभेत आ. प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा निषेध म्हणून भाजपाचे आ. प्रशांत परिचारिका हे कुर्डुवाडी - बार्शी रस्त्यावरून बार्शीकडे जात असताना रिधोरे ता.माढा येथे स्वाभिमानीचा कार्यकर्ता व माजी सैनिक बापू भीमराव गायकवाड याने रस्त्यात सायकल आडवी टाकून आ.परिचारक यांचा मार्ग अडवला व बाटलीतील काळे ऑईल गाडीच्या काचेवर फेकले. याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पण कुर्डूवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.