उमेदवारांनी अर्ज भरले, आता देणार एबी फॉर्म; आज शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:42 IST2025-12-30T10:40:50+5:302025-12-30T10:42:12+5:30
म्हेत्रे, शिंदे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

उमेदवारांनी अर्ज भरले, आता देणार एबी फॉर्म; आज शेवटचा दिवस
सोलापूर : सर्वपक्षीय उमेदवारांनी सोमवारी एबी फॉर्म विना अर्ज भरले. या पक्षांचे प्रमुख मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृत उमेदवारांचे नाव आणि त्यांचे एबी फॉर्म जमा करणार आहेत. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी सायंकाळी उमेदवार यादी अंतिम करण्यासाठी आमदारांसोबत बैठक घेतली.
निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडणे आवश्यक आहे. काँग्रेसने २० उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, यापैकी तीन जणांनी अर्ज भरण्यास नकार दिला. भाजपसह इतर पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे या उमेदवारांचे एबी फॉर्म मंगळवारी देण्यात आले नव्हते. भाजपच्या तीनही आमदारांनी आपल्या उमेदवारांना प्रथम अर्ज भरा. त्यानंतर आम्ही एबी फॉर्म देऊ, असे सांगितले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी होटगी रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये पुन्हा ठिय्या मारला होता. त्या ठिकाणी आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे यांच्यात बैठक झाली. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी उमेदवारांची यादी सादर केली. ज्या जागेवरून वाद आहेत त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत.
गोरे, कल्याणशेट्टी यांचा मुंबई दौरा
पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी सोमवारी मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. दुपारी साडेतीनच्या सुमाराला त्यांचे विमानतळावर आगमन झाले. दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा होती.
म्हेत्रेचा सवाल: नियम सर्वांना सारखाच आहे ना?
शिंदेसेनेचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनोज शेजवाल, सचिन चव्हाण यांनी महापालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. एबी फॉर्म मंगळवारी दुपारी ३ च्या आत जमा करावेत. निवडणूक कार्यालयात दुपारी ३ च्या आत येणाऱ्या उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळेल. बाहेर थांबलेल्या उमेदवारांना आत प्रवेश मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. हे नियम सर्वांना सारखेच आहेत ना? यात बदल करू नका, असेही म्हेत्रे यांनी सांगितले.
२६ प्रभागांमधून ३१६ उमेदवारांचे अर्ज
निवडणुकीसाठी २६ प्रभागातून सोमवारी एकूण ३१६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस आहे. अर्ज भरण्यासाठी दुपारी तीनपर्यंतची मुदत आहे.
किसन जाधव, गायकवाडांची घरवापसी धूसर
पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष संतोष पवार तसेच कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी किसन जाधव व नागेश गायकवाड या दोघांच्या प्रवेशाला तीव्र विरोध केल्याने दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा प्रवेश करून घेतला नाही, अशी चर्चा होती.