प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगळा; बीपच्या आवाजानंतर मतदान सोलापूर महानगरपालिका : आधी एक मत होते आता तीन किंवा चार मते असणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:39 IST2026-01-06T16:38:42+5:302026-01-06T16:39:48+5:30
जेव्हा दीर्घ असा बीपचा आवाज येईल तेव्हाच तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे, असेही कार्यालयाने कळविले आहे.

प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगळा; बीपच्या आवाजानंतर मतदान सोलापूर महानगरपालिका : आधी एक मत होते आता तीन किंवा चार मते असणार
सोलापूर - महापालिकांत सोलापुरातील प्रभागरचनेंतर्गत मतदारांना चार किंवा तीन मते द्यावी लागणार आहेत. प्रत्येक जागेसाठी ईव्हीएमवरील मतपत्रिकेचा रंग वेगवेगळा असणार आहे. जेव्हा दीर्घ असा बीपचा आवाज येईल तेव्हाच तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे, असेही कार्यालयाने कळविले आहे.
निवडणूक दरम्यान, प्रभाग १ ते २४ मधील मतदारांना एकूण चार मते द्यावयाची आहेत, तर प्रभाग २५ व २६ मधील मतदारांना एकूण तीन मते द्यायची आहेत. प्रत्येक जागेसाठी ईव्हीएमवरील मतपत्रिकेचा रंग वेगवेगळा असणार आहे. सोलापूर महानगरपालिकेतील १०२ जागांसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी (दि. १५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असणार आहे. शुक्रवारी (दि. १६) मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कळविले आहे.
..अशी आहे मतदान करण्याची प्रक्रिया
प्रभाग क्रमांक १ ते २४ करिता पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या जागेसाठी बटण दाबल्यानंतर उमेदवारांच्या समोरील लाल लाइट लागेल, मात्र बीप असा आवाज येणार नाही. मात्र शेवटच्या चौथ्या जागेसाठी बटण दाबल्यावर दीर्घ असा बीप आवाज येईल. याचप्रमाणे प्रभाग २५ व २६ साठी मतदारांनी पहिल्या, दुसऱ्या जागेसाठी बटण दाबल्यानंतर उमेदवारांच्या समोरील लाल लाइट लागेल. मात्र बीप आवाज येणार नाही. मात्र शेवटच्या तिसऱ्या जागेसाठी बटण दाबल्यानंतर बीप असा दीर्घ आवाज येईल. जेव्हा दीर्घ असा बीप आवाज येईल तेव्हाच तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे, असेही निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
'नोटा' पर्यायासाठी बटन आहे उपलब्ध...
जर तुम्हाला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असणार आहे. तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार आवडत नसेल आणि तुम्हाला त्यांच्यापैकी कुणालाही मत द्यायचे नसेल तर तुम्ही काय कराल? त्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यवस्था केली आहे. त्यावेळी तुम्ही नोटा बटण दाबून तुमचा निषेध नोंदवू शकता.
सोलापूर पालिकेसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते ५.३० अशी असणार आहे. मतदारांनी १०० टक्के मतदान करावे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये. प्रभाग १ ते २४ मधील मतदारांना एकूण चार मते द्यावयाची आहेत, तर प्रभाग २५ व २६ मधील मतदारांना एकूण तीन मते द्यायची आहेत.
- डॉ. सचिन ओम्बासे, आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, सोलापूर
मतपत्रिकांचा रंग वेगवेगळा असणार
अ - जागेसाठी पांढरा रंग
ब - जागेसाठी फिका गुलाबी रंग
क - जागेसाठी फिका पिवळा रंग
ड - जागेसाठी फिका निळा रंग