Maharashtra Election 2019: who will win in Sindhudurg? close fight in Kankavli, kudal, sawantwadi for Mla | Maharashtra Election 2019: अटीतटीच्या लढतींनी वाढवली कोकणची धडधड, कोण जिंकणार सिंधुदुर्गचा गड?
Maharashtra Election 2019: अटीतटीच्या लढतींनी वाढवली कोकणची धडधड, कोण जिंकणार सिंधुदुर्गचा गड?

- बाळकृष्ण परब

विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानाच्या सायंकाळीच प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनी राज्यातील निकालांचा संभाव्य कल दाखवला आहे. मात्र, काही मतदारसंघ असे आहेत जेथील निकालांचा कल सांगणे एक्झिट पोलवाल्यांनाही अवघड गेले आहे. अशा मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे.

राज्यात इतरत्र भाजपा सेना महायुती जोरदार मुसंडी मारताना दिसत असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध अधिकृतपणे थेट लढताना दिसले. एकीकडे कणकवलीत भाजपाच्या नितेश राणेंविरोधात सेनेने सतीश सावंत यांच्या रूपात आपला उमेदवार उतरवला. तर कुडाळ आणि सावंतवाडीत शिवसेनेविरोधात उभ्या असलेल्या रणजीत देसाई आणि राजन तेली यांना भाजपाने पुरस्कृत करून त्यांना उघडपणे भक्कम पाठबळ दिले. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या लढती झाल्या असून येथील निकालाबाबत थेट अंदाज वर्तवणे कठीण झाले आहे. 

शिवसेनेचे बऱ्यापैकी वर्चस्व असलेल्या सावंतवाडी मतदारसंघाचा विचार केल्यास येथे शिवसेनेचे दीपक केसरकर आणि भाजपा पुरस्कृत अपक्ष राजन तेली यांच्यात थेट लढत झाली. विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्याच्या तयारीत असलेल्या केसरकर यांची भिस्त शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांवर होती. तर राजन तेली अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असले तरी त्यांच्या विजयासाठी भाजपाकडून सर्व शक्ती पणाला लावण्यात आली. भाजपाचे गोव्यातील संपूर्ण मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांची पत्नी, संघाचे स्वयंसेवक असा मोठा फौजफाटा केसरकरांचे आव्हान मोडून काढण्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्यात नारायण राणे यांचे नुकतेच भाजपावासी समर्थकही मोठ्या संख्येने तेलींच्या प्रचारात होते. त्यामुळे येथे केसरकर चांगलीच दमछाक झाली. त्यात राष्ट्रवादीचे बबन साळगावकर हे किती मते घेतात यावर येथील दोन्ही उमेदवारांचे गणित अवलंबून आहे. एकंदरीत चित्र पाहता येथून केसरकर आणि तेली अशा दोघांनाही विजयाची आस बाळगण्यास हरकत नाही. मात्र अटीतटीच्या या लढतीत दीपक केसरकर 10 ते 12 हजारांच्या मताधिक्याने निसटता विजय मिळवतील, अशी शक्यता आहे.

कुडाळ-मालवण मतदारसंघाचा विचार केल्यास येथे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होते. गेल्यावेळी येथून शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पराभूत केल्याने हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी वैभव नाईक यांना कडवे आव्हान देण्यासाठी राणे समर्थकांनी कंबर कसली होती. मात्र ऐनवेळी झालेला उमेदवारीचा घोळ वैभव नाईक यांच्या पथ्थ्यावर पडलाय. दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेल्या रणजीत देसाई यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यात पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळाले नसल्याचाही देसाईंना फटका बसला. दुसरीकडे वैभव नाईक यांनी अनेक राणे समर्थकांना आपल्या बाजूने वळवून आपली बाजू भक्कम केली. त्यामुळे येथील मतदानाचा एकंदरीत कल पाहता वैभव नाईक 12 ते 15 हजार मतांनी विजयी होतील, अशी शक्यता आहे.

आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कणकवली मतदारसंघाचा आढावा घेतल्यास येथे अत्यंत चुरशीची लढत झाल्याचे संकेत मिळत आहेत. येथून नितेश राणे सहज विजय मिळवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांत हे चित्र पालटल्याचे संकेत मिळत आहेत. एकेकाळचे राणे समर्थक असलेल्या सतीश सावंत यांनीच बंडखोरी करून शिवबंधन हाती बांधून नितेश राणेंसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. या मतदारसंघात नितेश राणेंना सत्तर टक्के मते मिळतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी कणकवलीतील सभेत केला होता. मात्र प्रत्यक्षात मैदानावरील परिस्थिती फार वेगळी होती. सतीश सावंत यांच्यामागे शिवसैनिकांसोबतच संदेश पारकर, अतुल रावराणे हे भाजपातील बंडखोर, काँग्रेसचे विजय सावंत, माजी खासदार सुधीर सावंत यांचा पाठिंबा होता. त्यामुळे येथे शिवसेनेचे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, असे असले तरी नारायण राणेंचा प्रभाव आणि नितेश राणेंचा गेल्या पाच वर्षांतील जनसंपर्क यामुळे निवडणुकीत नितेश राणेंचे पारडे किंचीत का होईना जड राहिले. त्यामुळे नितेश राणेंना विजयाची संधी थोडी जास्त आहे. पण शिवसेना आणि सतीश सावंत शर्यतीतून बाद झालेले नाहीत. कमी मताधिक्याने का होईना त्यांचा विजय होऊ शकतो. एकंदरीत येथे मतमोजणीत चुरस दिसून येणार आहे. तसेच जो उमेदवार निवडून येईल त्याचे मताधिक्य फार नसेल.

 

 

Web Title: Maharashtra Election 2019: who will win in Sindhudurg? close fight in Kankavli, kudal, sawantwadi for Mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.