सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरगुती गणपतींचे विसर्जन; जयघोषच्या गजरात लाडक्या बाप्पाला दिला निरोप
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 5, 2022 19:17 IST2022-09-05T19:17:15+5:302022-09-05T19:17:45+5:30
काही गणपतींचे सातव्या दिवशी, नवव्या दिवशी तसेच दहाव्या दिवशी विसर्जन करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरगुती गणपतींचे विसर्जन; जयघोषच्या गजरात लाडक्या बाप्पाला दिला निरोप
देवगड (सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपती बाप्पा मोरया…!! पुढच्या वर्षी लवकर या…!! असा जयजयकार करीत ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत गौरीगणपती विसर्जनाच्या सहाव्या दिवशी लाडक्या गणेश भक्तजनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला व गौराईला निरोप दिला.
सोमवारी सहाव्या दिवशी गौरी गणपती विसर्जन असल्यामुळे तालुक्यातील विविध गावामधुन गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी महिलांनी गौराईचे विधीवत पुजन करून व गणरायासमोर महाआरत्या करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असा जयजयकार करीत सहाव्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावर्षी ३१ ऑगस्टला बाप्पाचे आगमन झाल्यानंतर १ सप्टेंबर रोजी दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
यानंतर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी गौरी गणपती असल्याने या गौरीचे रविवारी आगमन झाले. तर सहाव्या दिवशी मोठया उत्साहात भक्तीमय वातावरणामध्ये गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. तर काही गणपतींचे सातव्या दिवशी, नवव्या दिवशी तसेच दहाव्या दिवशी विसर्जन करण्यात येणार आहे.
विशेषतः करुन अनंत चतुर्दशी दिवशी तालुक्यातील बहुतांश घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते.काही किरकोळ प्रमाणात तालुक्यातील २१ दिवसांच्या गणपतींचे देखील विसर्जन करण्यात येते.मिठमुंबरी समुद्रकिनारी गौरी गणपतींचे मोठया उत्साहात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी जय घोषणा देत देवगड बंदर, आनंदवाडी, किल्ला, कुणकेश्वर, वाडातर, मोंड, मिठबांव, मुणगे आदी खाडीकिनारी व समुद्रकिनारी भागात वाजतगाजत, फटाक्यांच्या आतीषबाजीत लाडक्या गणरायाला व गौराईला निरोप देण्यात आला.