साहित्यिकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात राहावे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:20 IST2025-03-10T16:20:57+5:302025-03-10T16:20:57+5:30
वाईत दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन उत्साहात

साहित्यिकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात राहावे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले मत
वाई : ‘विद्यार्थी दशेत चांगलं ऐकलं, लिहिलं पाहिजं. तर नवीन पिढी विचाराने समृद्ध होईल. सध्या महाराष्ट्राची वैचारिक अधोगती झाली आहे. जागृत राहून मतदान केलं पाहिजं. साहित्यिकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच राहिलं पाहिजं. तर ते सरळ चालतात. जोखीम आणि जबाबदारी घेऊन जाणाऱ्या साहित्यिकांच्या मागे जनता उभी राहते,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक, संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले.
वाई येथे रविवारी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि कलासागर ॲकॅडमी, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात ते बोलत होते. सदानंद देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
यावेळी स्वागताध्यक्ष प्रा. लहुराज पांढरे, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, सरपंच सागर जमदाडे, उपसरपंच किरणकुमार जमदाडे, डॉ. नितीन कदम, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, रवींद्र घोडराज, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू, डॉ. विनोद कांबळे, अरुण आदलिंगे उपस्थित होते.
लवटे म्हणाले, ‘वाईमध्ये मराठी विश्वकोश आहे. वाईही पूर्वीपासून मराठी साहित्याची राजधानी आहे. प्रज्ञापाठ शाळेत ज्ञानाचे भांडार आहे. इंग्रजी शाळांवर बंदी आणल्याशिवाय मराठी शाळांचा विकास होणार नाही. २०२५ मध्ये हे टेक्नॉलॉजीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मराठी समृद्ध होण्यासाठी तंत्रज्ञान अंगीकृत केले पाहिजे. साहित्याची स्पर्धा जगातील साहित्याशी असली पाहिजे.
प्रा. लहुराज पांढरे म्हणाले, ‘वाईमध्ये होत असलेले संमेलन अभिमानाची साहित्य घटना आहे. अभिजात मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी नवी पिढी घडविण्याची जबाबदारी शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसह नवसाहित्यिकांची आहे.’
किशोर बेडकिहाळ म्हणाले, ‘विचाराची बैठक असणाऱ्या महाराष्ट्राचा ऱ्हास होत चालला आहे. बौद्धिक ऱ्हासाला आपणच जबाबदार आहोत. लेखकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्यावर काम करू शकत नाही. साहित्याची वाटचाल अडचणीतून सुरू आहे. बदलत्या विचारात वाचकांच्या अभिरुचीप्रमाणे लेखन केले पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भाषेला समृद्ध करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. लेखकांच्या मागे साहित्य संस्थांनी खंबीरपणे उभे राहील पाहिजे.’
ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, दिनकर झिंब्रे, प्रा. डॉ. पंडित टापरे, लेखिका प्रा. डॉ. रामकली पावसकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. हेमंत काळोखे यांनी आभार मानले.
अरविंद जगताप यांची प्रकट मुलाखत अन् कविसंमेलन
या संमेलनात दुपारी लेखक, पटकथाकार अरविंद जगताप यांची सरोजकुमार मिठारी व डॉ. दत्ता जगताप यांनी प्रकट मुलाखत घेतली. यामध्ये युवा पिढीला उत्तम मार्गदर्शन करण्यात आले.
कवी संमेलनामध्ये डॉ. कविता मुरूमकर, डॉ. चंद्रकांत पोतदार, विलास माळी, अजय कांडर, रमजान मुल्ला, ज्ञानेश सूर्यवंशी, रवी बावडेकर, लक्ष्मीकांत रांजणे, योगिता राजकर, सुस्मिता खुटाळे, वसंत शिंदे, डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, चंद्रकांत कांबिरे, डॉ. आदिती काळमेख, कांता भोसले, मनीष शिरतवडे यांनी सहभाग घेतला.
उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कथा कथन झाले. यामध्ये हिंमत पाटील, जोतीराम फडतरे व डॉ. अर्जुन व्हटकर यांनी सहभाग घेतला.