सातारा जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प वेळेत कार्यान्वीत
By नितीन काळेल | Updated: August 1, 2023 19:07 IST2023-08-01T19:06:32+5:302023-08-01T19:07:10+5:30
ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया : तयार गॅसचा वापर अंगणवाडीत आहारासाठी

सातारा जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प वेळेत कार्यान्वीत
सातारा : घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज बनल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाई तालुक्यातील वेळेत पहिला गोबरधन प्रकल्प कार्यान्वीतही झाला आहे. याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते झाले. तर येथील तयार गॅस अंगणवाडीला जोडला असून त्यावर आहार शिजविण्यात येत आहे.
स्वच्छ भारत मिशनच्या अपारंपरिक उर्जा निर्मितीच्या महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत सातार जिल्हा परिषदेमार्फत वेळे येथे गोबरधन प्रकल्प साकारला आहे. कारण, दिवसेंदिवस घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर समस्या बनू पाहत आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनसाठी याेग्य उपाय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. तसेच याठिकाणी जवळील हाॅटेल्स, घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
तर सध्या प्रकल्पात गॅस तयार होत आहे. या गॅसचा उपयोग अंगणवाडीला होत आहे. त्यासाठी जोडणीही करण्यात आली असून त्यावर आहार शिजवला जाणार आहे. तर भविष्यात वीज तयार केली जाणार आहे. यामुळे गावाला आऱ्थक उत्पादनाचाही मार्ग मिळणार आहे.