मंत्री देसाईंनी 'पाटणकरां'बाबतची भूमिका स्पष्ट करावी, म्हणजे जनतेचे प्रबोधन होईल; हर्षद कदमांनी लगावला टोला
By प्रमोद सुकरे | Updated: June 11, 2025 18:26 IST2025-06-11T18:25:56+5:302025-06-11T18:26:33+5:30
'भूकंपाची आम्हाला सवय'

मंत्री देसाईंनी 'पाटणकरां'बाबतची भूमिका स्पष्ट करावी, म्हणजे जनतेचे प्रबोधन होईल; हर्षद कदमांनी लगावला टोला
प्रमोद सुकरे
कऱ्हाड: महाविकास आघाडीच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला आहे. महायुतीतील शिंदे सेनेचे मंत्री व पाटणचे आमदार शंभूराज देसाई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मैत्रीचे संबंध पाहता देसाई यांना विचारूनच हा पक्षप्रवेश झाला असावा. त्यामुळे आता मंत्री देसाईंनी पाटणकरांच्या बाबतची आपली नेमकी काय भूमिका आहे ती एकदा स्पष्ट करावी म्हणजे मतदार संघातील जनतेचे प्रबोधन होईल असे टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
कदम म्हणाले, पाटण तालुक्यातील जनता ही वैचारिक पातळीवर काम करणारी आहे. त्यामुळे कोणी पक्ष बदलले म्हणून सगळ्याच लोकांना ते विचार पटलेले आहेत असे म्हणता येणार नाही. नजीकच्या काळामध्ये कार्यकर्त्याला भेटून, आमच्या विचाराच्या कार्यकर्त्यांना संघटित करून पुढील दिशा ठरवणार आहे.
आज जो तो चालत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या डोक्यात काय आहे? याबाबत छेडले असता, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. लढाई आमच्या रक्तात आहे. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात, जिल्ह्यात 'मशाल' घेऊन आमची लढाई यापुढेही कायम राहील असेही एका प्रश्नावर कदम म्हणाले.
भूकंपाची आम्हाला सवय
पाटण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा राजकीय भूकंप मानला जातो. याबाबत विचारले असता, आम्ही कोयना धरणाच्या जवळ रहातो. भूकंपांची आम्हाला सवय आहे.त्यातून पुन्हा उभारी कशी घ्यायची हे आम्हाला चांगले माहीत आहे.असेही एका प्रश्नावर बोलताना कदम यांनी सांगितले.
ते आता जनतेने ठरवायचं
आता मंत्री देसाई व त्यांचे विरोधक सत्यजित पाटणकर एकत्रित आले आहेत. उद्या ते मांडीला मांडी लावून बसलेले दिसतील. मग जनतेने काय करायचे? याबाबत छेडले असता ते आता जनतेने ठरवायचे आहे. पण मतदार संघात आम्ही सक्षम विरोधक म्हणून यापुढेही कार्यरत राहणार आहोत असेही कदम एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.