कंदी पेढ्याच्या साताऱ्याचा पुणे, मुंबई, कोल्हापूरला मोदकांचा प्रसाद, आठ फ्लेवर्सचे मोदक

By सचिन काकडे | Updated: August 30, 2025 13:43 IST2025-08-30T13:43:00+5:302025-08-30T13:43:38+5:30

लालबागच्या राजाला साताऱ्यातून खास प्रसाद

Kandi Pedha Satara offers modak prasad to Pune Mumbai Kolhapur modak in eight flavors | कंदी पेढ्याच्या साताऱ्याचा पुणे, मुंबई, कोल्हापूरला मोदकांचा प्रसाद, आठ फ्लेवर्सचे मोदक

कंदी पेढ्याच्या साताऱ्याचा पुणे, मुंबई, कोल्हापूरला मोदकांचा प्रसाद, आठ फ्लेवर्सचे मोदक

सचिन काकडे

सातारा : कंदी पेढ्यांसाठी जगभरात ओळख असलेल्या साताऱ्याने आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपली गोड ओळख मोदकांपर्यंत विस्तारली आहे. केवळ पेढेच नव्हे, तर साताऱ्यातील विविध फ्लेवर्सच्या मोदकांनी पुणे, मुंबई आणि कोल्हापूरसह अनेक शहरांतील गणेश मंडळांनाही भुरळ घातली आहे. हा गोड प्रसाद खाण्यासाठी गणेशभक्त आतुर झाले आहेत.

आठ फ्लेवर्सचे मोदक

साताऱ्यातील मिठाई विक्रेत्यांनी पारंपरिक मावा मोदकासोबतच मोदकांच्या चवीत विविधता आणली आहे. केशरी, कंदी, काजू, आंबा, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, पिस्ता आणि गुलकंद अशा आठ वेगवेगळ्या फ्लेवर्समधील मोदकांना प्रचंड मागणी आहे. हे मोदक केवळ चवीसाठीच नव्हे, तर त्यांच्या आकर्षक रूपासाठीही प्रसिद्ध होत आहेत. लहान गणेश मंडळांपासून ते मोठ्या मंडळांपर्यंत सर्व जण साताऱ्यातील मोदकांना पसंती देत आहेत.

लालबागच्या राजाला साताऱ्यातून खास प्रसाद

साताऱ्याच्या या गोड प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजासाठी पाठविण्यात आलेला दोन किलो वजनाचा महाकाय मावा मोदक. एका भक्ताने खास साताऱ्यातून हा मोदक पाठवून येथील मिठाईच्या दर्जावर शिक्कामोर्तब केले आहे. यानिमित्ताने साताऱ्याचा मोदक सर्वदूर पोहोचत आहे.

प्रत्येकासाठी काहीतरी खास

ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन, मिठाई विक्रेत्यांनी मोदक १० ग्रॅमपासून ते तब्बल दोन किलोपर्यंतच्या वजनात उपलब्ध केले आहेत. त्यामुळे लहान घरगुती पूजेपासून ते मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत, प्रत्येकाच्या गरजेनुसार मोदक खरेदी करणे शक्य झाले आहे.

असा आहे दर (किलोत)

  • मावा मोदक : ६००
  • फ्लेवर मोदक : ८००
  • कंदी मोदक : ७२०
  • काजू मोदक : १२००

साताऱ्याचा कंदी पेढा जितका प्रसिद्ध आहे, तितकीच आता मोदकांची मागणीही वाढत आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि अन्य जिल्ह्यांतून मोदकांना मोठी मागणी येत आहे. त्यामुळे यंदा या व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. - योगेश मोदी, व्यावसायिक, सातारा

Web Title: Kandi Pedha Satara offers modak prasad to Pune Mumbai Kolhapur modak in eight flavors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.