साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

By दत्ता यादव | Updated: May 31, 2025 21:55 IST2025-05-31T21:55:08+5:302025-05-31T21:55:21+5:30

कऱ्हाड येथे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. त्या रुग्णांना इतर कोणताही त्रास नाही. या कोरोनाची वेगळी अशी कोणतीही लक्षणे नाहीत. सर्दी, ताप, खोकला, कणकण अशी लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

First corona victim in Satara, number of patients rises to three; Citizens urged to take precautions | साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

सातारा : जिल्ह्यात कोरोनाने तब्बल अडीच वर्षांनंतर पुन्हा डोके वर काढले असून, यंदाचा कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका ७० वर्षीय वृद्धेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी दुपारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. कोरोनाबाधित महिला सातारा शहरातील उपनगरात राहणारी होती. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील तीन रुग्ण कऱ्हाड येथे, तर एक महिला रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होती. संबंधित ७० वर्षीय वृद्धेवर गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान शनिवारी दुपारी त्या वृद्धेचा मृत्यू झाला. संबंधित महिलेला काही वर्षांपूर्वीसुद्धा कोरोना झाला होता. दुसऱ्यांदा त्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्या महिलेला डायबेटिस आणि फुफ्फुसाचा आजारही होता, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी सांगितले.

कऱ्हाड येथे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. त्या रुग्णांना इतर कोणताही त्रास नाही. या कोरोनाची वेगळी अशी कोणतीही लक्षणे नाहीत. सर्दी, ताप, खोकला, कणकण अशी लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील सध्याच्या डॉक्टरांनी कोरोना काळामध्ये चांगले काम केले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेचा डॉक्टरांना अनुभव आहे. नागरिकांनी लसीकरण केलेले असल्यामुळे तसेच सध्या नागरिकांमधली प्रतिकारशक्तीही वाढलेली आहे. त्यामुळे भीती बाळगू नये. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. पूर्वी कोरोनामध्ये आपण ज्याप्रमाणे काळजी घेत होतो. त्याप्रमाणे काळजी घ्यावी. मास्क वापरावा, साबणाने हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहनही आरोग्य विभाकडून करण्यात आले आहे.

‘सिव्हिल’मध्ये २० खाटांचा अतिदक्षता विभाग तयार

जिल्हा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर ऑक्सिजन आणि इतर व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. सर्व औषधे उपलब्ध आहेत. तसेच २० खाटांचा स्वतंत्र अतिदक्षता विभागही तयार करण्यात आला आहे. तिथे सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे.

Web Title: First corona victim in Satara, number of patients rises to three; Citizens urged to take precautions