फलटणमधील गर्भलिंग निदानमध्ये आरोग्य उपसंचालकांचे कारवाइचे आदेश, ‘तो’ डाॅक्टर पसार
By दत्ता यादव | Updated: December 16, 2023 19:08 IST2023-12-16T19:08:28+5:302023-12-16T19:08:52+5:30
सातारा : फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे उसाच्या फडात अवैधरीत्या होत असलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाची पुणे येथील आरोग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनी दखल ...

फलटणमधील गर्भलिंग निदानमध्ये आरोग्य उपसंचालकांचे कारवाइचे आदेश, ‘तो’ डाॅक्टर पसार
सातारा : फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे उसाच्या फडात अवैधरीत्या होत असलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाची पुणे येथील आरोग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
पिंप्रदमधील शिंदे वस्तीवरील उसाच्या फडात गर्भलिंग निदान केले जात होते. ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर ही माहिती समाजासमोर आली. गेल्या चार दिवसांपासून आरोग्य विभागाकडून विविध पातळीवर या प्रकरणाची कसून चाैकशी सुरू आहे. त्यातच आता पुणे येथील आरोग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे.
त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांना या प्रकरणात विलंब न करता तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संशयितांनी केलेला हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे संबंधितांची चाैकशी करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने आता जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनीही या प्रकरणात कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
‘तो’ डाॅक्टर पसार
आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता संबंधित डाॅक्टर तेथून पसार झाल्याचे समोर आले. आजूबाजूच्या लोकांकडेही पथकाने चाैकशी केली. त्यावेळी फलटण परिसरातील अनेक लोकांनी आरोग्य विभागाच्या पथकाला सविस्तर माहिती दिल्याचे समजते. तो डाॅक्टर कोण आहे. याचीही माहिती दिली असून, त्या डाॅक्टरांकडून त्या ठिकाणी अवैधरीत्या गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती, अशी माहिती नागरिकांनी दिल्याचे खात्रीशीर समजते.