महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात घुमणार मिरजेतील वाद्यांचा आवाज; गणेशोत्सवामुळे ढोल, ताशाला मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 19:03 IST2025-08-23T19:03:27+5:302025-08-23T19:03:43+5:30

प्रांतनिहाय वाद्यांची परंपरा वेगळी

The sound of musical instruments from Miraj will resonate in Maharashtra, Karnataka, and Goa; Dhol, Tasha are in great demand due to Ganeshotsav | महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात घुमणार मिरजेतील वाद्यांचा आवाज; गणेशोत्सवामुळे ढोल, ताशाला मोठी मागणी

महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यात घुमणार मिरजेतील वाद्यांचा आवाज; गणेशोत्सवामुळे ढोल, ताशाला मोठी मागणी

सदानंद औंधे

मिरज : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच राज्यभरातील गणेश मंडळांसह विविध मंदिर व्यवस्थापनांनी, संस्थांनी मिरजेतील वाद्यांची खरेदी सुरू केली. मागणी वाढल्याने मिरजेतील वाद्यांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल नोंदली गेली आहे. महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातूनही मिरजेतील वाद्यांना मागणी आहे.

धार्मिक कार्यक्रम, सण उत्सवासाठी लागणारी सर्व वाद्ये मिरजेतील होलसेल बाजारात उपलब्ध असल्याने या वाद्यांना पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणासह कर्नाटक व गोव्यातूनही मागणी आहे.

मिरज शहरात येथे ढोल, ताशा, पखवाज, ढोलकी, वीणा, संबळ, हलगी, लेझीम, घुमका, झांज, टाळ, मृदंग, तबला, डग्गा, हार्मोनियम ही वाद्ये व बँजो पथकाला लागणारे साहित्य मिळते. मिरजेत तंतुवाद्यांसह गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, जयंती उत्सव, भजनी मंडळे, वाद्य पथकांना लागणारी सर्व वाद्ये मिळतात. वाद्यांना मागणी असल्याने प्रत्येक वर्षी श्रावण व गणेशोत्सवात मिरजेत वाद्यांच्या बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे विक्रेते संजय मिरजकर यांनी सांगितले.

कातडी धनगरी ढोल फक्त मिरजेतच मिळते. विविध गावांत किरकोळ विक्री करणारे विक्रेतेही मिरजेतून ही वाद्ये खरेदी करतात. विक्रीसह वाद्ये दुरुस्ती मिरजेत होत असल्याने मिरजेत वाद्ये खरेदीसाठी राज्यातील वाद्यपथके व व्यापारी येतात. मिरज परिसरात ढोलासाठी कातड्याची पाने तयार होतात. स्टील ढोलासाठी फायबरचे पान उत्तर प्रदेशातील मेरठ येथून येते. पंढरपूर, आळंदी, पैठण यासह अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व मंदिरात मिरजेतून वाद्ये जातात.

विविध गावांतील वारकरी मंडळे, भजनी मंडळे वीणा, पखवाज, तबला, डग्गा, ढोलकी, हार्मोनियम मिरजेतून खरेदी करतात. मंदिरात वापरासाठी स्वयंचलित आरती मशीनही उपलब्ध आहे. वाद्यांच्या किमती स्थिर असल्या तरी लाकूड महागल्याने ढोलकी, तबला, डग्गा ही लाकडी वाद्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत महागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

प्रांतनिहाय वाद्यांची परंपरा वेगळी

गणेशोत्सवात कोकणात पखवाज, ढोलकी, टाळ, स्टील ढोलवादन होते. गोव्यात पखवाज, हार्मोनियम, संबळ वादन केले जाते. मराठवाडा, विदर्भ, नाशिक येथे ढोल या नावाने ओळखले जाणारे स्टील ढोल-ताशे वादन होते. विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या आकारांतील ढोल वाजविले जातात. कर्नाटकात मोठ्या आकाराच्या हलगीचा वापर होतो.

वाद्यांच्या किमती

  • धनगरी ढोल लाकडी - ५ ते १२ हजार
  • स्टील ढोल - २ ते ४ हजार
  • ढोलकी - २ ते ३ हजार
  • हार्मोनियम - ८ ते २५ हजार
  • तबला डग्गा - ४ ते ६ हजार संबळ - दीड हजार रुपये जोडी
  • टाळ - ३०० ते १२०० रुपये ताशा - स्टील ८०० रुपये
  • तांबे पितळेचा ताशा- ५ ते १५ हजार झांज ५०० ते १५०० रुपये.

Web Title: The sound of musical instruments from Miraj will resonate in Maharashtra, Karnataka, and Goa; Dhol, Tasha are in great demand due to Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.