Sangli: तासगाव-कवठेमहांकाळची नजर राजकीय भूकंपाकडे; सगरे भाजपच्या वाटेवर?, पाटील-घोरपडे गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:47 IST2025-10-06T18:45:34+5:302025-10-06T18:47:02+5:30
रोहित पाटील यांची भूमिका निर्णायक

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळची नजर राजकीय भूकंपाकडे; सगरे भाजपच्या वाटेवर?, पाटील-घोरपडे गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता
दत्ता पाटील
तासगाव : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे. विशेषत: माजी खासदार संजय पाटील आणि महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. बदलत्या राजकीय घडामोडीत आमदार रोहित पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची भूमिका देखील लक्षवेधी ठरणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी लवकरच आरक्षण जाहीर होणार आहे तत्पूर्वीच मतदारसंघातील प्रबळ नेत्यांनी वर्चस्वासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, यावेळी बहुतांश नेत्यांकडून नवा राजकीय भूकंप घडविण्यासाठी व रचना आखली जात असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात नाट्यमय घडामोडी झाल्याचे दिसून येणार आहे.
सगरे गटाची वाटचाल भाजपच्या दिशेने?
अनिता सगरे अध्यक्ष असलेल्या महांकाली साखर कारखान्याचे घोंगडे अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे. या कारखान्याचे कोडे सोडविण्यासाठी सगळे गटाची वाटचाल भाजपच्या दिशेने असल्याची चर्चा सुरू आहे. कुंडल येथील शरद लाड यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सगळे गटाच्या प्रवेशाला बळ मिळाले आहे. सगरे गटाने राजकीय भूकंप घडवल्यास कवठेमहांकाळ तालुक्याचे राजकारण निर्णायक वळणावर येईल.
संजय काकांची भूमिका देणार पहिला धक्का
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा पहिला भूकंप माजी खासदार संजय पाटील यांच्या भूमिकेने बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. बुधवारी (दि. ८) काका गटाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
रोहित पाटील यांची भूमिका निर्णायक
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांची मतदारसंघातील भूमिका निर्णायक राहणार आहे. सद्य:स्थितीत रोहित पाटील यांचे बहुतांश जिल्हा परिषद गटावर वर्चस्व आहे. हे वर्चस्व अबाधित राखताना, आमदार पाटील अन्य नेत्यांशी हात मिळवणी करतील का? यावरच अनेक समीकरणे अवलंबून राहणार आहेत.
घोरपडे गट कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेल्या माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय धक्का दिला. आता जिल्ह्यात पडद्याआड नव्या राजकीय समीकरणांची नांदी सुरू झाली आहे. घोरपडे समर्थकांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याशी सलगी दिसून येत आहे. त्यामुळे मिरज पूर्व भाग आणि कवठेमहांकाळ तालुक्यात घोरपडे गट कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.