महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 20:15 IST2026-01-02T20:07:51+5:302026-01-02T20:15:12+5:30
Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Election: सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीचा प्रचार रणसंग्राम अधिकच रंगात आला आहे.

महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीचा प्रचार रणसंग्राम अधिकच रंगात आला आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर गाळणी लागल्याने ७८ जागांसाठी अखेर ३८१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. अपक्षांसह तब्बल ३०१ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे अनेक प्रभागांतील चित्र स्पष्ट झाले असले, तरी बहुतांशी ठिकाणी चौरंगी व बहुरंगी लढती अटळ ठरणार आहेत.
महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रारंभी तब्बल १ हजार ६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर ३८० अर्ज अवैध ठरले होते. अर्ज माघारीसाठी शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत अंतीम मुदत होती. या मुदतीत ३०१ उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, या प्रमुख पक्षांना बंडखोरीची लागण झाली असून बंडखोरी थोपवण्यात नेत्यांना काहीप्रमाणात यश आले आहे. महाआघाडी आणि महायुतीत बिघाडी झाल्यामुळे तीन प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. उर्वरित बहुतांशी प्रभागात चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार आहेत.
महाविकास आघाडी, महायुतीत बिघाडीचा फटका
महाआघाडी आणि महायुतीत काही ठिकाणी समन्वय न झाल्याने किमान तीन प्रभागांत तिरंगी लढती निश्चित झाल्या आहेत. उर्वरित बहुतांश प्रभागांत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिंदेसेना, उद्धवसेना आणि अपक्ष उमेदवारांमुळे चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार असून मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दोन प्रभागातच दुरंगी लढत
प्रभाग ११ (ड) मध्ये माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पंणतू आणि माजीमंत्री प्रतिक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसकडून तर त्यांच्या विरोधात भाजपकडून मनोज सरगर मैदानात आहेत. एकूण ७८ प्रभागात प्रभाग ११ (ड) आणि प्रभाग १६ (ब) या दोन प्रभागातच दुरंगी लढत होत आहे. प्रभाग ११ मध्येच अ, ब आणि क गटात चौरंगी, तिरंगी लढत होत आहे.
चौकट
काँग्रेसला मोठा धक्का
महापालिकां निवडणूक अर्ज माघारीचा अखेरच्या दिवशी मिरजेत प्रभाग सातमध्ये दोन महिला उमेदवारांनी माघार घेऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. प्रभाग सात मधील गायत्री कुल्लोळी व शुभांगी देवमाने या काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली असून शुभांगी देवमाने या आता जनसुराज्य पक्षातर्फे लढणार आहेत.