आषाढीसाठी मिरजेतून पंढरपूरला भजनी वीणांचा पुरवठा, दीडशे वर्षापासून अविरत परंपरा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:32 IST2025-06-28T17:32:29+5:302025-06-28T17:32:51+5:30

तीन पिढ्यांपासून मिरजेतील सतारमेकरांची निर्मिती

Supply of Bhajan Veenas from Miraj to Pandharpur for Ashadhi, an unbroken tradition for 150 years | आषाढीसाठी मिरजेतून पंढरपूरला भजनी वीणांचा पुरवठा, दीडशे वर्षापासून अविरत परंपरा कायम

आषाढीसाठी मिरजेतून पंढरपूरला भजनी वीणांचा पुरवठा, दीडशे वर्षापासून अविरत परंपरा कायम

सदानंद औंधे

मिरज : आषाढी एकादशीजवळ येत असल्याने वारकऱ्यांसाठी भजनी वीणा तयार करण्यासाठी मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांची धावपळ सुरू आहे. गेली दीडशे वर्षे मिरजेत तयार झालेल्या भजनी वीणा आषाढी कार्तिक वारीला पंढरपूरला पाठविण्यात येतात.

टाळ व मृदंग व वीणेच्या साथीने वारकरी विठ्ठलाची भक्ती करतात. दरवर्षी आषाढी वारीला पंढरपुरात वीस लाख वारकरी जमतात. या वारकऱ्यांसाठी दरवर्षी सुमारे दहा हजार भजनी वीणाची मागणी असते. मात्र या वीणा तयार करणे वेळखाऊ असल्याने एवढ्या मोठ्या संख्येने वीणांच्या मागणीची पूर्तता होऊ शकत नसल्याचे मिरज तंतुवाद्य क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर यांनी सांगितले. मिरजेतील तांतुवाद्य कारागीर भजनी वीणा बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तीन पिढ्या येथील सतारमेकर या नावाने ओळखले जाणारे मुस्लिम तंतुवाद्य कारागीर भजनी वीणा बनवितात. 

दरवर्षी मिरजेत मोठ्या प्रमाणात भजनी वीणा तयार होतात. तिसऱ्या व चौथ्या पिढीतही मिरजेत वीणा बनविण्याची परंपरा सुरू आहे. आषाढी एकादशीशिवाय, कार्तिकी एकादशीला आळंदी येथे व नाथषष्ठीला पैठण येथे मिरजेतून भजनी वीणा रवाना होत असल्याचे उस्मानगणी सतारमेकर यांनी सांगितले. वारकऱ्यांसाठी तयार होणाऱ्या भजनी वीणेची किमत साडेतीन ते नऊ हजार रुपयापर्यंत आहे. 

भजनी वीणा सुमारे पाच वर्षे टिकते. मिरजेतून आयात करून पंढरपुरात विणांची विक्री होते. भजनी वीणेशिवाय पखवाज व तबल्यालाही मागणी असते. तंतुवाद्यनिर्मितीसाठी ख्याती असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांनी पूर्वजांचा वारसा निष्ठेने जोपासला आहे. देश-विदेशांतील नामांकित गायक-वादकांना मिरजेतून दर्जेदार तंतुवाद्ये पुरविण्यात येतात. देशातील प्रसिद्ध संगीत महोत्सवात कलाकारांना तंतुवाद्यांचा पुरवठा मिरजेतून होतो.

२०० वर्षांपासून तंतुवाद्य निर्मिती

मिरजेत २०० वर्षांपासून तंतुवाद्य निर्मिती सुरू आहे. मिरजेत तयार होणाऱ्या सतार व तंबोऱ्याला जीआय नामांकनही मिळाले आहे. मिरजेतील तंतुवाद्य कला टिकावी, वाढावी यासाठी उद्योग विभागाने सतार व तंबोरा ही तंतुवाद्ये तयार करणाऱ्या कारागिरांसाठी क्लस्टर योजनेसही काही वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. मिरजेतील तंतवाद्य निर्माते मजीद सतारमेकर यांना नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

Web Title: Supply of Bhajan Veenas from Miraj to Pandharpur for Ashadhi, an unbroken tradition for 150 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.