शिराळकरांचे नागावरील प्रेम; विहिरीत पडलेल्या नागांना दिले जीवदान, दोरखंड बांधून काढले बाहेर
By श्रीनिवास नागे | Updated: April 19, 2023 16:24 IST2023-04-19T15:50:47+5:302023-04-19T16:24:44+5:30
यापूर्वी अनेक जखमी नागांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत

शिराळकरांचे नागावरील प्रेम; विहिरीत पडलेल्या नागांना दिले जीवदान, दोरखंड बांधून काढले बाहेर
शिराळा (जि. सांगली) : इटकरे (ता. वाळवा) व मांगले (ता. शिराळा) येथे दोन दिवसात विहिरीत पडलेल्या दोन नागांना शिराळकरांनी जीवदान देऊन नागावरील प्रेम दाखवून दिले.
सोमवार, दि. १७ रोजी इटकरे येथील धीरज पाटील यांच्या पायऱ्या नसलेल्या २५ फूट खोल विहिरीत दोन नाग पडले होते. विहीर बांधीव नसल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. धीरज पाटील यांनी हे नाग पहिले व त्याची माहिती शिराळा येथील श्रीराम उर्फ बंटी नांगरे यांना दिली. यानंतर दिग्विजय शिंदे, श्रीनाथ गव्हाणे व श्रीराम नांगरे - पाटील तेथे गेले.
दोरखंड बांधलेल्या झाडाच्या फांदीला नायलॉनचे पोते अडकवून हळूहळू विहिरीतील नागांजवळ जवळ सोडले. नाग या फांदीवर अथवा जाळीत अडकतो का याचे प्रयत्न सुरू झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर एक नाग फांदीवर आला. त्याला पोत्यात घेण्यात आले. हळूहळू दोन्ही दोरखंडांच्या साहाय्याने पोते वर घेण्यात आले व त्यातील नाग पकडण्यात आला. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. एक नाग सापडला नाही.
मंगळवारी मांगले येथील उत्तम गावडे यांच्या विहिरीतही नाग असल्याचे समजले. त्यालाही श्रीराम नांगरे, दिग्विजय शिंदे, श्रीनाथ गव्हाणे, रोहित गावडे यांनी विहिरीतून बाहेर काढले व नैसर्गिक अधिवासात सोडले.
यापूर्वीही वाचवले नागांना
शिराळकरांनी यापूर्वी अनेक जखमी नागांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. नांगरट करताना नांगरात अडकलेल्या, कूपनलिका - विहिरीत अडकलेल्या, वाहनांच्या धडकेत, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागांचे प्राण वाचवले आहेत.