Sangli: कुरळपच्या भगतसिंग मंडळाने मिरवणुकीतील उधळपट्टीला दिला फाटा, अपघातग्रस्त तरुणाला केली आर्थिक मदत
By संतोष भिसे | Updated: September 26, 2023 18:36 IST2023-09-26T18:35:31+5:302023-09-26T18:36:21+5:30
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील भगतसिंग गणेश मंडळाने गणेशोत्सवातील डामडौल आणि उधळपट्टीला फाटा देत पैशाचा विधायक विनियोग केला. ...

Sangli: कुरळपच्या भगतसिंग मंडळाने मिरवणुकीतील उधळपट्टीला दिला फाटा, अपघातग्रस्त तरुणाला केली आर्थिक मदत
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील भगतसिंग गणेश मंडळाने गणेशोत्सवातील डामडौल आणि उधळपट्टीला फाटा देत पैशाचा विधायक विनियोग केला. अपघातात जखमी तरुणाला ५० हजारांची मदत देऊन त्याचे प्राण वाचविले.
मंडळाने उत्सवामध्ये व्याख्यान, महाप्रसाद, जोरदार विसर्जन मिरवणूक व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची जोरदार तयारी केली होती. त्यासाठी आगाऊ पैसेही दिले होते. याचवेळी गावातील सचिन दिनकर फल्ले हा युवक अपघातात जखमी झाला. जत येथील नोकरीच्या ठिकाणाहून कुरळपला येत असताना दुचाकीच्या आडवी शेळी आली. त्यात घसरुन रस्त्यावर आपटल्याने सचिनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला सांगलीत खासगी रुग्णालयात दाखल केले असून, चार दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. ५० हजार रुपयांची रक्कम सचिनच्या उपचारांसाठी दिले. सध्या त्याच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत आहे. मंडळाच्या मदतीमुळे फल्ले कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. मंडळाने गणेशोत्सवाचा खरा उद्देश प्रत्यक्षात आणत अन्य मंडळांपुढे आदर्श ठेवला आहे.