मिरजेतील तंतुवाद्यनिर्मितीसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची साथ, क्लस्टर योजनेचा कारागिरांना फायदा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 19:04 IST2025-01-02T19:04:10+5:302025-01-02T19:04:29+5:30

संशोधनासाठी इमारत उभारणार

Now with modern technology for making stringed instruments in Miraj | मिरजेतील तंतुवाद्यनिर्मितीसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची साथ, क्लस्टर योजनेचा कारागिरांना फायदा 

मिरजेतील तंतुवाद्यनिर्मितीसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची साथ, क्लस्टर योजनेचा कारागिरांना फायदा 

सदानंद औंधे

मिरज : तंतुवाद्यनिर्मितीबाबत ख्याती असलेल्या मिरजेतील तंतुवाद्यनिर्मिती कला आता आधुनिक रूप धारण करीत आहे. उद्योग विभागाच्या क्लस्टर योजनेतून तंतुवाद्यनिर्मिती विकास व संशोधनासाठी इमारत उभारण्यात येत आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या तंतुवाद्यनिर्मितीसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

तंतुवाद्यनिर्मितीसाठी मिरज शहर प्रसिद्ध आहे. दीडशे वर्षांहून अधिक काळ येथे तंतुवाद्यनिर्मितीचा व्यवसाय सुरू आहे. मिरजेतील तंतुवाद्य तयार करणाऱ्या कारागिरांनी आपल्या पूर्वजांचा तंतुवाद्यनिर्मितीचा वारसा तितक्याच निष्ठेने जोपासला आहे. मिरजेतून देश-विदेशातील नामांकित गायक-वादकांना दर्जेदार तंतुवाद्ये पुरविण्यात येतात. देशातील प्रसिद्ध संगीत महोत्सवात कलाकारांना तंतुवाद्यांचा पुरवठा मिरजेतून होतो. मिरजेतील तंतवाद्य निर्माते मजीद सतारमेकर यांना नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

मिरजेतील तंतुवाद्य कला टिकावी, वाढावी यासाठी उद्योग विभागाने तंतुवाद्य कारागिरांच्या क्लस्टर योजनेस काही वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे. सतार व तांबोरा ही तंतुवाद्ये तयार करणाऱ्या कारागिरांसाठी उद्योग विभागाच्या क्लस्टर योजनेंतर्गत मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंटस क्लस्टर या संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेला उद्योग विभागातर्फे जागा दिली आहे. सुमारे २३० सभासद असलेल्या या संस्थेचे मिरजेत वर्कशॉप सुरू केले आहे.

७० लाखांची आधुनिक उपकरणे

तंतुवाद्यनिर्मितीसाठी लागणारी सुमारे ७० लाख किमतीची आधुनिक उपकरणे व अवजारे येथे उद्योग विभागातर्फे देण्यात आली आहेत. पारंपरिक पद्धतीने तंतुवाद्य तयार करण्यासाठी वेळ लागतो; मात्र अत्याधुनिक यंत्राद्वारे तंतुवाद्यनिर्मिती जलद होणार आहे.

तंतुवाद्यांचा विकास, संशोधन व प्रदर्शनासाठी सुमारे एक कोटी खर्चाची इमारत उभारण्यात येणार आहे. एक कोटी खर्चाच्या या कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मिळणार आहे. इमारतीची उभारणी झाल्यानंतर आणखी दीड कोटी किमतीची उपकरणे तंतुवाद्य कारागिरांसाठी उपलब्ध होणार आहेत. यामुळे मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्राला आधुनिक स्वरूप येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर व अल्ताफ पिरजादे यांनी सांगितले.

Web Title: Now with modern technology for making stringed instruments in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.