Vidhan Sabha Election 2024: प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, हेरगिरीसाठी खास माणसे
By अविनाश कोळी | Updated: November 15, 2024 17:33 IST2024-11-15T17:33:49+5:302024-11-15T17:33:59+5:30
राजकारणात नवा फंडा : दुर्लक्षित कार्यकर्त्यांवर माहिती संकलनाची जबाबदारी

Vidhan Sabha Election 2024: प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, हेरगिरीसाठी खास माणसे
अविनाश कोळी
सांगली : प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून सुरू असलेल्या हालचाली, गुप्त बैठका, प्रचार यंत्रणेतील विशेष बाबी यांची इत्थंभूत माहिती मिळविण्यासाठी अनेकांनी खास कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या गटात शिरून हेरगिरी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. याशिवाय मित्रपक्षांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रतिस्पर्धी उमेदवार व त्यांच्या गटाच्या चाली कळाव्यात, याची खबरदारी घेतली जात आहे. चुरशीच्या निवडणुकीत गाफीलपणा नको म्हणून अशा माहितीच्या संकलनासाठी खास माणसे तैनात केली जात आहेत. सांगली जिल्ह्यातील आठपैकी बहुतांश ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असल्याने निवडणुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. थोडासा गाफीलपणाही धोक्याचा ठरू शकतो म्हणून उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी टीम तयार केली आहे.
सकाळी आठ ते दहापर्यंत प्रचारकार्यात उमेदवार व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना अन्य कोणत्याही गोष्टीत लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे वेळावेळी विरोधकांच्या हालचाली कळाव्यात म्हणून माणसे पेरण्याचे काम केले जात आहे. काहीवेळा समोरच्या उमेदवाराकडे प्रचाराला माणसे पाठवून माहिती मिळविली जात आहे. एकमेकांच्या गटात शिरून हेरगिरी करणारे अनेक जण सध्या प्रचारात दिसत आहेत. कधी एका उमेदवाराच्या कानाला लागणारे कार्यकर्ते दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारात दिसत आहेत.
मित्रपक्षांच्या नेत्यांवरही ‘वॉच’
काही मतदारसंघांत मित्रपक्षांचे नेते औपचारिकदृष्ट्या उमेदवाराच्या प्रचारात दिसत असले तरी त्यांच्याकडून कोणताही घात होऊ शकतो, अशी शंका काहींना वाटते. त्यामुळे मित्रपक्षांच्या नेत्यांसमवेत उमेदवारांनी आपल्या खास माणसांची नियुक्ती त्यासाठी केली आहे. अशा नेत्यांबरोबर उमेदवारांच्या गटातले काही कार्यकर्ते सतत दिसत आहेत.
रात्री घेतला जातो आढावा
दररोज रात्री दहा वाजता प्रचार थांबतो. त्यानंतर उमेदवारांचे निवासस्थान, कार्यालये याठिकाणी हेरगिरी करणाऱ्या माणसांकडून आढावा घेतला जात आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हालचाली पाहून प्रचार नियोजनात बदलही करण्यात येत आहेत.
‘अर्थ’कारणावरही लक्ष
प्रतिस्पर्धी उमेदवार कोणत्या गोष्टीवर कसा खर्च करीत आहे. त्याला कोणत्या घटकाची मदत मिळते, अशा सर्व गोष्टींची खबरबात घेतली जात आहे.
हेरगिरीच्या गोष्टी स्पष्ट
जिल्ह्यात काही ठिकाणी पैसे वाटपाची तक्रार झाली. पोलिस कारवाईसुद्धा झाली. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीही करण्यात येत आहेत. या गोष्टी हेरगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे समोर येत आहेत.