Vidhan Sabha Election 2024: मजुरांचे अड्डे पडले ओस; जेवणावळी झाल्या फुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 18:05 IST2024-11-08T18:04:01+5:302024-11-08T18:05:49+5:30
निवडणुकीत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हजारोंच्या हातांना काम मिळाले

Vidhan Sabha Election 2024: मजुरांचे अड्डे पडले ओस; जेवणावळी झाल्या फुल्ल
सांगली : शहरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. प्रचारात रॅली, मेळावे, बैठका, सभांचे सत्र सुरु झाले आहे. त्याचा परिणाम शहरातील बांधकामावर झाल्याची ओरड बांधकामाच्या ठेकेदारांकडून होत आहे. या निवडणुकांमुळे ठिय्यांवरील मजुरांची संख्या रोडावली असून, मजूर आता कामासाठी नाही, तर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत उभे आहेत.
निवडणुकीत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जे काही प्रचाराचे प्रकार करावे लागत आहेत, त्यात हजारोंच्या हातांना काम मिळाले आहे. यात मंडप व्यावसायिक, कॅटरिंग, मजुरांचे ठिय्ये, खानावळी, बेरोजगार युवक, ऑटो, ई-रिक्षा, ट्रान्सपोर्टर आदींना ही रोजगार मिळाला आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत या लहान- मोठ्या व्यवसायातील मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.
दिवाळीचा फिव्हर ओसरला
दिवाळीचा फिवर साधारणतः तुळशी विवाहापर्यंत असतो. पण, यंदा दिवाळीपेक्षा निवडणुकीचा ज्वर लोकांमध्ये चांगलाच चढला आहे. सकाळपासून लोकं नवीन कपडे, गळ्यात दुपट्टे घालून, दुचाकीत पेट्रोल भरून घराबाहेर पडत आहेत. राजकीय पक्षाच्या बूथमध्ये दिवसभर ठिय्या देतात. घरातला चिवडा, चकल्या सोडून कार्यकर्ते बूथमध्येच दिवसभर फिरताना दिसत आहेत. सायंकाळी सभा, बैठकांमध्ये उमेदवाराच्या मागेमागे दिसतात. रात्रीला जेवणावळीवर ताव मारताना ही दिसत आहेत.
निवडणुकीने वातावरण गरम
- उमेदवाराच्या प्रचाराचे भोंगे सकाळपासूनच वस्त्यावस्त्यांमध्ये वाजायला लागले आहेत. सध्या उमेदवारांच्या वस्त्यांमध्ये कार्यकर्त्यांसोबत गृहभेटी सुरू आहेत. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनांचे सत्र ही सायंकाळी जोरात सुरू आहे. उमेदवारांनी तर पायाला भिंगरीच बांधली आहे, तर कार्यकर्ते त्याच्या दिमतीला दिवसरात्र कष्ट घेत आहे.
- निवडणूक आयोगाने भित्या रंगविणे बंद केल्यामुळे वस्त्या-वस्त्यांमध्ये उमेदवाराच्या कार्य कर्तृत्वाचे पॉम्पलेट वाटले जात आहेत. तर, दुपारी छोटेखानी महिला मेळावे भरविले जात आहेत. सायंकाळी आणि रात्रीला कार्यकर्त्यांची खाण्यापिण्यासाठी चंगळ सुरू आहे.
यांनाही मिळाला रोजगार
निवडणुकीत उमेदवाराला प्रचारासाठी मोठा खर्च करावा लागलो. त्यासाठी ऑटोरिक्षा, ई-रिक्षा, सायकल रिक्षा, डिझायनर्स, बॅनर, प्रिंटर्स स्टिकर, फ्रेम मेकर्स, पॉम्प्लेट, झेंडे बनवणारे हे उपयोगी पडतात. मोठ्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला प्रचाराचे साहित्य पक्षाकडूनच पुरविले जाते. परंतु, अपक्ष उमेदवारांना प्रचार साहित्यासाठी खर्च करावा लागतो. जिल्ह्यातील आठ विधानसभेत ९९ उमेदवार रिंगणात असून, अपक्षांची संख्या भरपूर आहे.