Sangli: गोटखिंडीत मशिदीमध्ये गणराय थाटात विराजमान, ४४ वर्षांचे ऐक्याचे सुवर्णपान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 19:23 IST2025-08-28T19:23:22+5:302025-08-28T19:23:34+5:30
हिंदू-मुस्लीम बांधव साजरे करतात सर्व सणवार

Sangli: गोटखिंडीत मशिदीमध्ये गणराय थाटात विराजमान, ४४ वर्षांचे ऐक्याचे सुवर्णपान
प्रतापसिंह माने
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) गावात धर्मभेदांची दरी नाही, जाती-पाताींच्या भिंती नाहीत... अशी सुसंवादाचे वारे वाहणारे सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गाव, गेली ४४ वर्षे एक अनोखी परंपरा जोपासत आहे. गावातील ऐतिहासिक मशिदीत दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो आणि ही प्रथा आज हिंदू-मुस्लीम ऐक्याचे तेजस्वी प्रतीक ठरली आहे.
सन १९८१ मध्ये मुसळधार पावसामुळे गणपती प्रतिष्ठापनेसाठी निवारा न मिळाल्याने, गावातील हिंदू व मुस्लीम बांधवांनी मशिदीत पहिल्यांदाच श्री गणेशाची प्रतिमा विराजमान केली. त्या दिवशी पेरलेले सामंजस्याचे बीज आज एक भव्य वटवृक्ष बनले आहे. मिरवणुका, आरत्या, भजन-कीर्तन, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या गावाने महाराष्ट्रास एकात्मतेचा आदर्श घालून दिला आहे.
"गणपती बाप्पांच्या आगमनाने गावात केवळ धार्मिक वातावरण नव्हे, तर आनंद आणि आपुलकीचा नवा सण दरवर्षी उजाडतो," असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. तर, मुस्लीम बांधवांचे म्हणणे आहे, "गणेशोत्सव आमच्यासाठीही घरचा सणच आहे. आयोजनात आम्हीही तितक्याच उत्साहाने सहभागी होतो." गोटखिंडीतील सामंजस्यपूर्ण सण साजरेपणाने ४४ वर्षांत एकदाही कुठलाही वाद निर्माण झालेला नाही. उलट येथे हिंदू-मुस्लीम बांधवांच्या घराघरांत एकमेकांचे सण तितक्याच श्रद्धेने साजरे केले जातात.
झुंझार चौकातील मशिदीत गणपती स्थापनेची परंपरा आमच्या गावासाठी अभिमानाची बाब आहे. हिंदू-मुस्लीम बंधुत्वाचे हे बीज आज एकतेच्या विशाल वटवृक्षात परावर्तित झाले आहे. गावातील प्रत्येक सण हा सर्वांसाठी असतो, हेच गोटखिंडीचे वैशिष्ट्य आहे. - दीपाली पाटील, सरपंच, गोटखिंडी