मिरजेत केमिकल कारखान्यात स्फोट, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 15:26 IST2021-11-26T15:24:08+5:302021-11-26T15:26:23+5:30
ही आग इतकी भीषण होती की, बचावकार्य करत असताना दोन पोलीस अधिकारी या आगीत जखमी झाले.

मिरजेत केमिकल कारखान्यात स्फोट, दोघे जखमी
मिरज : मिरज एमआयडीसीतील केमिकल्स या ॲसिड कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर कारखान्याला आग लागली. मिलिंद केमिकल्स असे या आग लागलेल्या कारखान्याचे नाव आहे. या आगीची माहिती अग्निशमन दलास देण्यात आली आहे. दरम्यान बचावकार्य करत असताना दोन पोलीस अधिकारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील अशी जखमींची नावे आहेत.
एमआयडीसीतील परिसरात मिलिंद मारुती बाबर यांचा केमिकल्सचा कारखाना आहे. कारखान्यात ॲसिड केमिकल्स मोठ्या प्रमाणात असल्याने अचानक आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याचे निर्दशनास येताच घटनास्थळाहून अग्निशमन दलाला या घटनेसंबंधी माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान ही आग इतकी भीषण होती की, बचावकार्य करत असताना दोन पोलीस अधिकारी या आगीत जखमी झाले.
या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.